अमरावती : मध्यप्रदेशातून अमरावतीकडे येणाऱ्या दोघांकडून स्थानिक गुन्हे शाखेने दोन देशी कट्टे व आठ जीवंत काडतूस जप्त करण्यात आले. सोमवारी सकाळी परतवाडा धारणी मार्गावर गस्तीदरम्यान सिनेस्टाईल पाठलाग करून त्या दोघांना परतवाडानजिकच्या हॉटेल संकेत पाटील धाब्याजवळ पकडण्यात आले. यापुर्वी २१ जानेवारी रोजी देखील स्थानिक गुन्हे शाखेने परतवाड्यातून दोन देशी कट्टे व दोन जीवंत काडतूस जप्त केले होते. दोन दिवसांतील एलसीबीची ही दुसरी दमदार कारवाई ठरली. अब्दुल यासीर अ. कलाम (२५) व अब्दुल आवेज अ. कदीर (२२, दोघेही रा. पठानचौक, अमरावती) असे अटक आरोपींची नावे आहेत.
अलिकडच्या काळात अनेक आरोपी हे गुन्हा करताना अवैध अग्निशस्त्रांचा वापर करत असल्याचे निरिक्षण नोंदवून अशा तस्करांना अटकाव करून भविष्यातील गंभीर गुन्हयांना आळा घालण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरिक्षक तपन कोल्हे यांच्या नेतृत्वातील स्थानिक गुन्हे शाखा अधिक ॲक्टिव्ह झाली. २३ जानेवारी रोजी ते पथक परतवाडा धारणी रोडवर गस्त घालत असताना त्यांनी वनविभागाच्या बिहाली नाक्याजवळ दुचाकीने धारणीकडून येत असलेल्या दोघांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांना पाहून ते दुचाकी भरधाव वेगाने चालवत पुढे निघाले. पळून जाण्याचा प्रयत्नात असताना एलसीबीने त्यांचा पाठलाग करून त्यांना परतवाड्यातील हॉटेल संकेत पाटील धाबा येथे अडविले. दुचाकीवरील त्या दोघांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन देशी कट्टे, आठ जीवंत काडतुसे, मोबाईल, दुचाकी असा एकूण १.३४ लाखांचा माल हस्तगत केला.
आरोपींचा सहकारी फरार
अन्य एका आरोपीच्या सांगण्यावरून आणि त्याच्यासाठीच ते देशी कट्टे मध्यप्रदेशातून घेऊन आपण अमरावतीकडे जात होतो, अशी कबुली अ. यासीर व अ. आवेज यांनी दिली आहे. तो फरार आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरूध्द गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचा कसून शोध घेत घेतला जात आहे. आरोपींना परतवाडा पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले आहे.
एसपींची स्ट्रॉंग पोलिसिंग
पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी तडीपारी, एमपीडीएसारखी आयुधे वापरण्यास सुरूवात केली आहे. त्यांच्याच मार्गदर्शनात तपन कोल्हे यांच्या नेतृत्वातील ‘टिम एलसीबी’ने दमदार कारवाईचा धडाका लावला आहे. दरम्यान दोन कट्टे पकडण्याच्या कार्यवाहीत एलसीबीचे सहायक पोलीस निरिक्षक रामेश्वर धोंडगे, अंमलदार दीपक उईकेे, युवराज मानमोठे, स्वप्निल तंवर, रविंद्र वऱ्हाडे, सागर नाठे, कमलेश पाचपोर हे सहभागी झाले.