अमरावती : वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिपलागड शिवारात देवी मंदिरासमोरील धुर्वे यांच्या शेतातील विहिरीत सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास शेतमजुरांना मृतदेह तरंगताना दिसला. घटनास्थळी दाखल झालेल्या शेंदूरजनाघाट पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर आणखी एकाचा शोध घेतला. विहिरीशेजारी दुचाकीसुद्धा उभी होती. दोन मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत हे इसापूर व उदापूर येथील रहिवासी आहेत. ही हत्या की आत्महत्या, अशी चर्चा घटनास्थळावर होती.
प्राप्त माहितीनुसार, भीमराव किसान कांबळे (६० रा . इसापूर), गणेश महादेव वानखडे (५३, रा. उदापूर) अशी मृतांची नावे आहेत. विहिरीजवळ एमएच २७ सीई ५२४४ क्रमांकाची दुचाकी उभी होती. ही घटना मध्य प्रदेश-महाराष्ट्र सीमेवरील वरुड तालुक्यातील पिपलागड देवी मंदिरासमोरील सीताराम धुर्वे यांच्या शेतात घडली. मृत गणेश वानखडे यांचे खापरखेडा शिवारात शेत असल्याने ते नेहमीच शेतात जात होते. रविवारी सायंकाळी ६ वाजता दोघेही शेतात गेले असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी सकाळी ११ च्या सुमारास धुर्वे यांच्या शेतात कामावर गेलेल्या शेतमजुरांना विहिरीत मृतदेह दिसला. याबाबत शेंदूरजनाघाट पोलिसांना माहिती देण्यात आली. ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांनी जमादार कुंदन मुधोळकर, विलास कोहळे, अतुल मस्की यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी विहिरीशेजारी दुचाकी उभी होती, तर सुरुवातीला एक मृतदेह आढळून आल्याने एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. पुन्हा पोलिसांना संशय आल्याने विहिरीत गळ फिरविला. यावेळी दुसराही मृतदेह हाती लागला.
चर्चेला उधाण
इसापूर येथील भीमराव कांबळे आणि उदयपूर येथील गणेश वानखडे अशी मृतांची ओळख पटली. दोन्ही मृतदेह पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळावर कुठेही वाद झाल्याचे किंवा इतर खुणा आढळून आल्या नाहीत. त्यामुळे एकाच वेळी दोघेही विहिरीत पडले कसे हा प्रश्न ग्रामस्थांमध्ये चर्चेचा होता. या घटनेबाबत तर्कवितर्क काढण्यात येत असून हत्या की आत्महत्या, अशी चर्चा परिसरात आहे. घटनेचा पुढील तपास शेंदूरजनाघाट पोलीस करीत आहेत.