गणेश वासनिक
अमरावती : जिवाच्या आकांताने पळणाऱ्यावर देशी कट्ट्यातून फायर करण्यात आला. मात्र, तो नेम चुकल्याने कट्ट्यातून निघालेली ती गोळी शाळेतून घराकडे चाललेल्या विद्यार्थिनीच्या पायाच्या पोटरीत शिरली. यात ती १३ वर्षीय मुुलगी गंभीर जखमी झाली. तिला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
पोलीस सूत्रांनुसार, पठाण चौक ते भातकुली मार्गावरील बाबा चौकालगतच्या चारा चौकात ही थरारक घटना १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास घडली. फायर करणारा आरोपीदेखील गंभीर जखमी झाला आहे. घटनेवेळी तीन फायर करण्यात आले. पैकी घटनास्थळाहून दोन रिकामे कारतूस जप्त करण्यात आले. सदफ परवीन नौशाद कुरेशी (१३, हैदरपुरा) असे जखमी मुलीचे नाव आहे. आरोपी अहमद चना व चिकन व्यावसायिक जुबेरखाँ यांच्यात शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास चारखंबा परिसरात पैशांच्या वादातून बाचाबाची झाली. त्यावर सायंकाळी तुझ्या दुकानात येतो, पाहून घेतो, असे सांगून अहमद तेथून निघून गेला. दुसरीकडे जुबेरने आपल्या परफेक्ट चिकन सेंटरमध्ये तीन तलवारी व देशी कट्टा आणून ठेवला.
दरम्यान, अहमद हा आपल्या सहकाऱ्यांसमवेत सायंकाळी पाचच्या सुमारास तलवारी घेऊन जुबेरच्या दुकानात पोहोचला. अहमद व त्याच्या साथीदाराने जुबेरवर हल्ला चढविला. प्रचंड हलकल्लोळ उडाला. त्यातच जुबेरने स्वत:कडील देशी कट्टा अहमदवर रोखला. त्यामुळे अहमद दुकानाकडून मुख्य रस्त्याच्या दिशेने पळाला. जुबेरने त्याच्या दिशेने तीन फायर केले. पैकी एक गोळी रस्त्याने पायदळ जात असलेल्या सदफच्या पायाच्या पोटरीत शिरली. ती कोसळताच सर्व आरोपी तेथून सुसाट पळाले. उर्दू असोसिएशन स्कूलची विद्यार्थिनी सदफ ही चांदणी चौकाकडून हैदरपुऱ्याकडे पायी जात होती. प्रत्यक्षदर्शींनी तिला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले. अहमद व अन्य आरोपींच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जुबेरलादेखील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. गोळी नेमकी कुणी चालविली, याबाबत मोठा संभ्रम होता. चौकशीदरम्यान आरोपींची नावे निश्चित झाली. उशिरा रात्रीपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सीपी, डीसीपी, एसीपी घटनास्थळी
फायरची घटना घडताच नागपुरी गेट पोलीस ठाण्यासभोवताल मोठा जमाव एकत्र आला. आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी तात्काळ घटनास्थळ गाठले. पोलीस उपायुक्त एम.एम. मकानदार, सहायक पोलीस आयुक्त पूनम पाटील, गुन्हे शाखेचे निरीक्षक अर्जुन ठोसरे यांनी नागपुरी गेट पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत, तर ठाणेदार पुंडलिक मेश्राम आरोपींचा शोध घेत आहेत.
आरोपीने केलेल्या फायरमध्ये रस्त्याने जात असलेली एक १३ वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. आरोपींपैकी एक जण जखमी आहे. घटनास्थळाहून तलवारी जप्त केल्या. आरोपींचा कसून शोध सुरू आहे.
- एम.एम. मकानदार, पोलीस उपायुक्त