अमरावती: शहर पोलीस भरतीमधील दोन उमेदवारांनी सादर केलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र बनावट निघाले आहेत. याप्रकरणी शहर गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक राजकिरण येवले यांच्या तक्रारीवरून फ्रेजरपुरा पोलिसांनी रामेश्वर अंकुश खराडे (२७, रा. शेलू, ता. वाशिम, जि. उस्मानाबाद) व तौसिफ मोहम्मद रब्बानी (रा. शंकरजिन, एसआरपीएफ गट क्रमांक २, जालना) यांच्याविरूध्द १५ मे रोजी सायंकाळी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
दोन्ही आरोपींनीे बीड येथील जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयाकडून निर्गमित झालेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पोलीस भरती दस्तावेजाला जोडले होते. खातरजमा केल्यानंतर ते बनावट निघाल्याने दोघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी अमरावती शहर आयुक्तालय आस्थापनेवर २० पोलीस शिपाई भरतीसाठी जाहिरात प्रकाशित झाली होती. त्या पदांपैकी आर्थिक दुर्बल घटकासाठी एक जागा प्रकल्पग्रस्त उमेद्वाराकरीता समांतर आरक्षणमध्ये राखीव होती. पोलीस शिपाई भरती प्रक्रियेदरम्यान १३ एप्रिल रोजी पोलीस आस्थापना शाखेने तात्पुरती निवड यादी अमरावती शहर संकेत स्थळावर प्रकाशित केली. तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांना २१ एप्रिल रोजी कागदपत्र |पडताळणीकरीता मुळ शैक्षणिक प्रमाणपत्रासह हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
गडचिरोलीच्या प्रकाराने खातरजमाउमेदवार रामेश्वर खराडे व तौसिफ मोहम्मद रब्बानी शेख यांनी मुळ शैक्षणिक प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी जिल्हा पुनर्वसन अधिकारी, बीड यांच्या कार्यालयाचे त्यांच्या नावे निर्गमित केलेले प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केले. परंतु काही दिवसांपूर्वी गडचिरोली येथे पोलीस भरतीमध्ये बीडमधील काही लोकांनी बनावट प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र सादर केल्याने खराडे व रब्बानी यांनी दिलेल्या प्रमाणपत्राच्या पडताळणीसाठी पोलीस उपायुक्तांनी एक पोलीस पथक बीडला पाठविले.
बीड पुनर्वसन कार्यालयाचे पत्र
पोलीस उपनिरिक्षक येवले यांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. तेथील अधिकाऱ्यांनी दोन्ही उमेदवारांच्या नावाचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित झाले नसल्याचे सांगितले. तसेच नमुद जावक क्रमांकाचे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्राचे संचिता यादी पाहिली असता ती प्रमाणपत्रे दुस-या व्यक्तींच्या नावे दिसून आली. बीड जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्यांनी ते दोन्ही प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र निर्गमित केले नसल्याचे पत्र १ मे रोजी अमरावती पोलिसांना दिले.
ते म्हणाले आम्ही ओळखत नाहीरामेश्वर खराडे व तौसिफ रब्बानी यांनी जोडलेल्या प्रमाणपत्रातील माहितीनुसार अमरावतीचे पोलीस पथक बीड जिल्ह्यातील दोन संबंधित महिला व पुरूषांच्या घरी जाऊन आले. त्या दोघांनीही आपण खराडे व रब्बानी यांना ओळखत नसल्याचे सांगितले. तथा तसे प्रमाणपत्र आपण हस्तांतरीत केले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावरून दोघांचाही खोटारडेपणा उघड झाला.