अमरावती : गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवघ्या एका तासात चेनस्नॅचिंगच्या दोन घटना घडल्या. एका घटनेत १२ हजार रुपये किमतीची चेन, तर दुसऱ्या घटनेत २४ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन घेऊन चोराने पळ काढला. याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी २० सप्टेंबर रोजी रात्री १०.३९ च्या सुमारास अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला. या दोन्ही घटना सोमवारी रात्री ७.२५ ते ८.३० च्या सुमारास घडल्या.
स्वावलंबीनगर परिसरातील एक महिला मैत्रिणीसोबत किराणा आणण्यास जाताना एक अज्ञात दुचाकीस्वार त्यांच्या मागून आला. त्याने महिलेच्या गळ्यातील ३ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन हिसकावून दुचाकीने पळ काढला. ही घटना कठोरा नाका मार्गावरील दामोधर कॉलनीतील नवनाथ मंदिराजवळ घडली. त्या चोराने काळ्या रंगाचे टीशर्ट व केसरी रंगाचा दुपट्टा बांधलेला होता, असे निरीक्षण फिर्यादी महिलेने नोंदिवले. ती महिला तक्रार नोंदविण्यासाठी गाडगेनगर पोलीस ठाण्यात आली असता त्याच वर्णनाच्या इसमाने त्याच परिसरात दुसरी चेन स्नॅचिंग केल्याचे उघड झाले.
बॉक्स
विद्युतनगरातील घटना
शामनगर, विद्युतनगर येथील रहिवासी ४६ वर्षीय महिला हर्षराज कॉलनी चौकातून शामनगर बोर्डाजवळून घराकडे परतताना दुचाकीहून आलेल्या इसमाने त्यांच्या गळ्यातील १६ ग्रॅम वजनाची चेन हिसकली. मात्र, त्याच्या हातात केवळ ६ ग्रॅम वजनाचा तुकडा लागला. २४ हजार रुपये किमतीच्या चेनमधील ६ ग्रॅमचा तुकडा घेऊन आरोपीने पळ काढला. या घटनेतील चोराचे वर्णन नवनाथ मंदिराजवळ तासाभारापूर्वी घडलेल्या घटनेशी साम्य राखणारे असल्याचे लक्षात आले. त्यामुळे दोन्ही घटनांप्रकरणी एकाच अज्ञाताविरूद्ध गाडगेनगर पोलिसांनी भादंविचे कलम ३९२ अन्वये गुन्हा दाखल केला.
///////////////