परतवाडा: स्थानिक डेडिकेटेड कोविड रुग्णालयासह खासगी कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान दोन कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, शहरातील कोविड रुग्णालय हाऊसफुल्ल आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता डेडिकेटेड कोविड रुग्णालयातील कर्मचारी नोकरी सोडून जात आहेत. तर एक कर्मचारी कोरोना संक्रमित झाला आहे .
कोविड रुग्णालयात स्टाफची कमतरता आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत असून ते तणावाखाली आहेत.
अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात १ ते १७ एप्रिलदरम्यान २०३ रुग्ण कोरोना संक्रमित आहेत. यातील फक्त दोन मृत्यूची नोंद शासनदरबारी घेण्यात आली आहे. अचलपूरसह लगतच्या मेळघाटात सारीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात सारीच्या रुग्णांकरिता केवळ तीन बेडची व्यवस्था आहे. ही व्यवस्था तात्पुरत्या स्वरूपाची आहे. सारीच्या रुग्णांना आयसीयूची गरज असल्यामुळे सारीचे रुग्ण अचलपूर उपजिल्हा रुग्णालयातून सरळ अमरावतीला जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले जात आहेत.
जिल्हास्तरावरही गर्दी
जिल्ह्यातून व लगतच्या परिसरातून जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल होणाऱ्या सारीच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. १८ एप्रिलला सारीच्या रुग्णांकरिता जिल्हा रुग्णालयातील आपत्कालीन वाॅर्ड रिकामा करण्यात आला आहे. तेथे सारीच्या रुग्णांना ठेवले जात आहे. जिल्हा रुग्णालयातील सारीच्या रुग्णांची वाढती संख्या बघता जिल्ह्यात स्फोटक परिस्थिती निर्माण झाली आहे. एकट्या अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात एप्रिलच्या १८ दिवसांत सारीचे १८ रुग्ण नोंदल्या गेले आहेत.
त्रासदायक पीपीई किट
अचलपूर येथील डेडीकेटेड कोविड रुग्णालयात असलेल्या पीपीई किटने स्टाफ त्रस्त झाला आहे. या पीपीई किट जाड आहेत. पावसाळ्यातील रेनकोटपेक्षाही त्या जाड असल्यामुळे डॉक्टरसह स्टाफ घामाने ओलाचिंब होत आहे. यात त्यांना काम करताना अडचणी येत आहेत. यात एक डॉक्टर व कर्मचारी अस्वस्थ होऊन रुग्णालयातच जमिनीवर कोसळल्याची सूत्रांची माहिती आहे.