अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या अखत्यारितील शासकीय आश्रमशाळा आणि वसतिगृहांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जातील. अमरावती विभागाशी संलग्न सात प्रकल्प कार्यालय स्तरावर दोन कोटी रुपयांतून सीसीटीव्ही कॅमेरे खरेदीचा प्रस्ताव असून, त्याकरिता लवकरच ई-निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये आरोग्य सुविधेअभावी विद्यार्थ्यांचे मृत्यू , विद्यार्थिनींचे लैंगिक शौषण, साप चावल्याने मृत्यू, निकृष्ट दर्जाचे जेवण, अस्वच्छ पाणीपुरवठा, मुख्याध्यापक आणि शिक्षकांची गैरहजेरी अशा एक ना अनेक समस्या, प्रश्नांचा सामना आदिवासी विद्यार्थ्यांना करावा लागतो. त्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमे-यांची मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भात अमरावती अपर आयुक्त कार्यालयाला धारणी, अकोला, पुसद, नांदेड, औरंगाबाद, कळमनुरी आणि पांढरकवडा सात प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून सुमारे एक हजार सीसीटीव्ही कॅमे-यांचा मागणी प्रस्ताव आला आहे.
अशी होईल खरेदीई-निविदा प्रक्रियेतून सीसीटीव्ही कॅमेरे खरेदी करण्यासाठी नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे व अन्य साहित्य हे ब्रॅण्डेड कंपनीचे असावे, अशी अट आहे. यात आऊटडोअर सीसीटीव्ही कॅमेरे ६४५, इनडोअर कॅमेरे २८२, मेमोरी स्टोअर (एनईआर) ९१, मॉनिटर १२७, हार्डडिस्क १२७, केबल ६३७०० मीटर, पीओ स्विच १२७, ब्राऊन ट्रॅक २१३ आणि जीआय केबल २६३५२ मीटर यांचा समावेश राहणार आहे. अनुदानित आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासंदर्भात संस्थाचालकांना पत्राद्वारे कळविले आहे, तर शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहात सीसीटीव्ही कॅमे-यांच्या खरेदीसाठी निविदा प्रक्रिया लवकरच राबविली जाईल.- गिरीश सरोदे,अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती