धामणगाव रेल्वे (अमरावती) - सूर्योदयापूर्वी रेती उत्खननास परवानगी नसताना रेती वाहून नेणारे तब्बल ९२ ट्रक पहाटे ५ वाजता पकडून परीवीक्षाधीन पोलीस अधीक्षकांनी दोन कोटींची रेती जप्त केली. दरम्यान, उशिरा रात्रीपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती.वर्धा व अमरावती जिल्ह्याची सीमा निश्चित करणाºया धामणगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या बोरगाव धांदे परिसरात रेतीघाट क्रमांक २६९ येथून अवैध रेती उत्खनन व साठवणूक केलेली रेती मध्यरात्री तसेच पहाटे नेली जात असल्याची माहिती अमरावती जिल्हा विशेष शाखेचे परीविक्षाधीन अधिकारी समीर शेख यांनी मिळाली. दरम्यान, पहाटे पाच वाजता त्यांनी आपल्या विशेष पथकासह या रेती उत्खननावर कारवाई केली़ अमरावती, कारंजा व अकोला जिल्ह्यात जाणारे ९२ ट्रक त्यांनी पकडले़ ताब्यात घेतलेल्या ट्रकची तब्बल पुलगाव ते देवगाव रस्त्यावर अडीच किलोमीटरपर्यंत रांग होती. विशेषत: तीन पोकलॅन, दोन डोंगीही जप्त केल्या. सदर कारवाईनंतर तब्बल ९२ ट्रक तळेगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले़ या कारवाईत जिल्हा गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रभारी सदानंद मानकर, वासुदेव नागवरकर, सुनील मलातपुरे, बाबा ठाकरे, अतुल गवळी, अश्विनी यादव, अरविंद लोहकरे, तळेगाव दशासरचे ठाणेदार, गोपाल उपाध्याय, मंगरूळचे ठाणेदार नरेंद्र ठाकरे, महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते़ वृत्त लिहिपर्यंत संबंधित ट्रकवर कारवाई व्हायची होती़ पोलीस प्रशासनाची सर्वांत मोठी रेती तस्करीविरुद्ध केलेली ही पहिली कारवाई आहे़
धामणगावात दोन कोटींची रेती जप्त, ९२ ट्रक पकडले, राज्यात सर्वात मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2018 10:07 PM