नरेंद्र निकम ।लोकमत न्यूज नेटवर्कमोर्शी : शहरात ४ सप्टेंबरला आलेला महापूर जसे अनेक नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त करून गेला तसेच त्याने एका मातेच्या काळजाचा तुकडा हिरावून नेला. महापुरात अडकलेले दोन दिवसाचे नवजात धो-धो बरसलेल्या पावसाचे बळी ठरले. गरीब, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबावर या घटनेने आभाळच कोसळले.शहराच्या मध्यातून वाहणाऱ्या दमयंती नदीच्या काठावरील गधेघाटपुरा येथील सुमन नानू सूर्यवंशी या २८ वर्षीय महिलेने मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयात २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. सात वर्षांपूर्वी लग्न झालेल्या या मातेला पाच वर्षांची सोनाली ही मुलगी आहे. नैसर्गिक प्रसूतीनंतर ४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. या नवजाताला ती आनंदाने न्हाऊ घालणार, अंगाखांद्यावर खेळविणार होती. परंतु, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. दुपारी १२ पासून सुरू झालेल्या पावसाने रौद्र रूप कायम ठेवले असतानाच घरामागील बाजूने दमयंती नदीच्या पुराचा लोंढा एकाएकी परिसरात घुसला. अनेक घरांमध्ये सात ते आठ फुटांपर्यंत पाणी शिरले. सुमनचा पती यावेळी मजुरीसाठी बाहेर गेला होता. शेजाऱ्यांच्या हा प्रकार लक्षात येताच महिलेला शिडी लावून एका घरातून दुसऱ्या घरात असे करीत सुरक्षित स्थळी हलविले. पुराच्या लोंढ्याने घरातील सर्व सामान वाहून नेल्याने नवजात बालकावर धरायला ना कुठली टोपली, ना वरून छत. पुराच्या पाण्यातून डोक्यावर दोन हातांवर घेऊन त्याला आईजवळ नेण्यात आले. ते पावसाचा मार सहन न करू शकल्याने लगेच आजारी पडले. मोर्शीत प्राथमिक उपचारानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. क्षणात होत्याचे नव्हते झाले. पाच तासांत पुराचे पाणी ओसरले; मात्र मातेच्या आसवांचा बांध फुटला.एक दिवस उशिरा सुटी झाली असती तर....नैसर्गिक प्रसूतीमुळे सुमन व नवजात बालकाला दवाखान्यातून दोन दिवसांत सुटी देण्यात आली. त्यानंतर दोन तासांत महापूर आला. एक दिवस उशिरा सुटी झाली असती, तर बाळ वाचले असते, अशी खंत सुमनचे वडील बाबूलाल सेमलकर यांना आहे. आठ दिवसांची प्रसूत माता पुराच्या पाण्याने आजारी पडल्याने खासगी दवाखान्यात उपचार घेत आहे.सासऱ्यांच्या आश्रयाने उदरनिर्वाहनानू सूर्यवंशी (रा. इटावा माजरी, जि. बैतुल, मध्यप्रदेश) हा सासू-सासऱ्यांच्या आश्रयाने तीन वर्षांपासून मोर्शी येथे राहतो. त्यांच्याकडे बँकेचे पासबूक नाही. त्यामुळे तात्काळ मदत कशी मिळणार, ही विवंचना आहे. नानूच्या घरातील सिलिंडरसह धान्य व सर्व साहित्य वाहून गेले.चार महिन्यांचे बाळ सुरक्षितपरिसरातील सुनीता विशाल पिंपळकर या महिलेच्या चार महिन्यांच्या बाळाला कुटुंबीयांनी वेळीच सुरक्षित स्थळी हलविले. शहरात दिवसा पूर आल्याने जीवितहानी झाली नसली तरी नवजात दगावले.
दोन दिवसांचे नवजात ठरले पाऊसबळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 6:00 AM