अमरावती : कोरोनावरील उपाययोजनांसाठी शासकीय व निमशासकीय कर्मचारी, अधिकारी यांचे मे महिन्यातील दोन दिवसांचे वेतन कपात केले जाणार आहे. यातून जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधी वर्ग करण्यात येणार आहे. सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी यासंदर्भात निर्णय जारी केला आहे. सर्व मंत्रालय विभाग, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका नगरपालिका, नगर परिषद, सार्वजनिक उपक्रम, महामंडळे मंडळे तसेच सर्व स्वायत्त संस्थेचे विभागप्रमुख, कार्यालय प्रमुखांनी या निर्णयाची अंमलबजावणी करावयाची आहे.
राज्यातील कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी शासकीय कर्मचाऱ्यांचे दोन दिवसांचे वेतन कापून घेण्यात यावे, असे निवेदन कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांनी शासनाला दिले होते. त्यानुसार मे महिन्याच्या वेतनातून भारतीय प्रशासन सेवा, भारतीय पोलीस सेवा, भारतीय वनसेवा व राज्य सेवा व राज्य शासकीय, निमशासकीय राजपत्रित गट अ, गट ब यांनी प्रत्येकी दोन दिवसांचे, तर गट ब अराजपत्रित गट क व गट ड या कर्मचाऱ्यांचे प्रत्येकी एका दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीत जमा करण्यात येणार आहे. वेतन कपात करताना ते मूळ वेतन अधिक महागाई भत्ता यांच्या एकूण रकमेच्या आधारित गणना करून कपात करावे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एकत्रित होणारी रक्कम विभागप्रमुख, कार्यालय प्रमुखांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या संकेतस्थळावर भरणा करून त्या ठिकाणी तयार होणारी पोचपावती घ्यावी किंवा बँक खात्यात जमा करावी. पोचपावती गोळा केलेल्या रकमेच्या देणगीदारांची यादीसह माहिती मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडे पाठवावा, अशा सूचना दिल्या आहेत. विशेष म्हणजे सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी यांचे निवृत्ती वेतनातून दोन दिवसाचे वेतन कपात करण्यात येणार आहे. वेतन कपातीवर एखाद्याची हरकत असेल तर तसे विभागप्रमुख किंवा कार्यालय प्रमुखाचे लेखी कळवावे लागणार आहे.