अमरावती : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने परतवाड्यातील आठवडी बाजारात संशयास्पद स्थितीत बसलेल्या दोघांकडून दोन देशी कट्टे व चार जीवंत काडतूस जप्त केले. २० जानेवारी रोजी रात्री ही दमदार कारवाई करण्यात आली. यापुर्वी देखील १९ जानेवारी रोजी रात्री तेथील जयस्तंभ चौकातून देशी कट्टा बाळगून असलेल्या एकाला अटक करण्यात आली होती. सलग दोन दिवसात परतवाड्यातून तीन देशी कट्टे पकडण्यात आले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी रात्री अवैध हत्यारे बाळगणाऱ्यांबाबत माहिती घेत असता परतवाडा आठवडी बाजारातील हॉटेल सुर्यकमलमागे मोकळया मैदानात शेराभाई ठाकुर हा एका दुचाकीवर गावठी देशी कटटा घेऊन असल्याची टिप मिळाली. त्यावरून आठवडी बाजारातील हॉटेलमागे पाहणी केली असता दोन इसम काळया शर्टमध्ये काळया-लाल रंगाच्या दुचाकीवर संशयितरित्या बसून असल्याचे दिसून आले. त्यांची अंगझडती घेतली असता शुभम उर्फ शेराभाई कुंजीलाल सेंगर ठाकुर (२८, रा. पेंशनपुरा, परतवाडा) याच्या कमरेत चंदेरी रंगाचा गावठी बनावटीचा कटटा व पॅन्टच्या खिशात दोन जिवंत काडतूस व दिपक उर्फ दिप्याभाई राममनोहर यादव (३७, रा. देवीनगर, लोहारा, यवतमाळ) याच्या कमरेत काळया रंगाचा गावठी बनावटीचा कटटा व दोन जिवंत काडतूस लोड केलेल्या अवस्थेत मिळून आले.
कट्टा घ्यायला यवतमाळहून पोहोचला परतवाड्यात
आरोपींकडे कटटे व काडतूस बाळगण्याबाबत त्यांच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही. आरोपी दिपक उर्फ दिप्याभाई यादव याने तो यवतमाळहून शेराभाई सेंगर याचेकडून गावठी कटटा विकत घेण्याकरीता आला असल्याची कबुली दिली. आरोपींकडून देशी कट्टे, जीवंत काडतूस, मोबाईल, दुचाकी असा एकुण १लाख ३७ हजार रुपयांचा मुददेमाल जप्त करण्यात आला.
दोघेही सराईत गुन्हेगार
दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, अप्पर पोलिस अधिक्षक शशीकांत सातव यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखाप्रमुख तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरिक्षक रामेश्वर धोंडगे, सहायक फौजदार दिपक उईके, अंमलदार युवराज मानमाठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, कमलेश पाचपोर यांनी ही कारवाई केली.