वाडी - नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेलमधून मध्यरात्री जेवण आटोपून दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवीत परत जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार पाणी भरलेल्या खदाणीत पडून चालक अविनाश मेश्राम व अविनाश पठाडे यांचा गुदमरून जागीच मृत्यू झाला तर तिघे गंभीर झालेत. शुक्रवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास वडधामना परिसरात ही घटना घडली. पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार अविनाश अनिल मेश्राम (२५)रा. रक्षा कॉलनी, काटोल रोड हा क्रुज गाडी क्रमांक एम.एच. ३१ डी.एन.९९९० ने मित्र अविनाश मार्कंड पठाडे (२४) रा. सुरेंद्रगड मज्जीद गिट्टीखदान नागपूर, नरेंद्र कानफाडे (२५)रा. हजारी पहाड, गिट्टीखदान, मनीष विरेंदर शर्मा (२६) रा. कळमेश्वर व बाबा ठाकूर (२४) सुरेंद्रगड कांचनमाला शाळेजवळ गिट्टीखदान यांच्यासह गोंडखैरीजवळील होटल स्काय गार्डन येथे शुक्रवारी रात्री जेवण करायला आले होते. तिथे त्यांनी मद्यपानही केले. मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास नागपूरकडे घरी परत जात असताना चालक अविनाश मेश्राम याने दारूच्या नशेत निष्काळजीपणे भरधाव वेगाने गाडी चालवीत असताना त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी रस्त्याच्या किनारी भागाला घासत वडधामना परिसरातील कायरॉस हाटेलच्या समोरील पाण्याच्या खदाणीत पडली. ही बाब हॉटेलच्या सुरक्षा रक्षकांच्या लक्षात येताच त्याने घटनेची माहिती वाडी पोलिसांना कळविली.यानंतर वाडी पोलिसांनी घटनास्थळ गाठून गाडीत अडकलेल्यांना बाहेर काढण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु समोरचे दार उघडल्या न गेल्याने चालक अविनाश मेश्राम व त्याचा मित्र अविनाश पठाडे यांचा गाडीतच पाण्यात गुदमरून मृत्यू झाला. यासोबतच रंजन कानफाडे, मनीष शर्मा, बाबा ठाकूर यांना गंभीर अवस्थेत पोलिसांनी बाहेर काढले. याप्रकरणी पोलिसांनी भांदविच्या कार चालकावर २७९, ३०४(अ), ३३८, ४२७ कलमान्वये गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक श्यामराव कावनपुरे व आशिष लोणकर, सुनील कवडे, महेंद्र सानमांडे, संजय पांडे तपास करीत आहे.
कार खदानीत पडून दोन तरुणांचा मृत्यू, तीन जण गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2019 4:15 PM