फोटो - २५एएमपीएच०२ - अशोक मालधुरे
वनोजा बाग/लेहेगाव : अमरावती जिल्ह्यात सातेगाव (ता. अंजनगाव सुर्जी) व काटपूर ममदापूर (ता. मोर्शी) येथे २४ तासांत दोन शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे.
अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सातेगाव येथील अल्पभूधारक शेतकरी अशोक जगन्नाथ मालधुरे (५६) यांनी २४ सप्टेंबरला सायंकाळी ५.३० वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
त्यांच्याकडे सवा एकर शेती असून ते मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत होते. आजारपणामुळे तेदेखील नियमित मिळत नव्हते. गावातील मित्र व नातेवाईक यांच्याकडून ते पैसे उसनवार घेत असत. तेच पैसे फेडण्याची विवंचना असल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला, अशी माहिती पुढे आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व विवाहित मुलगी आहे.
मोर्शी तालुक्यातील काटपूर ममदापूर येथील शेतकरीपुत्राने विषारी द्रव्य प्राशन करून शुक्रवारी रात्री राहत्या घरात आत्महत्या केली. अतुल उत्तमराव काळे (३५) असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे. त्याची आई सरला काळे यांच्या नावे असलेली तीन एकर शेती तो कसत होता. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे नदीकाठी असलेली जमीन पिकासह खरडून गेली. कपाशीचे पीक हातचे गेल्याने निराश झालेल्या अतुलने शुक्रवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन केले. त्याच्या पश्चात आई, दोन भाऊ आहेत. घटनास्थळी शिरखेड ठाण्याचे पोलीस नाईक बलवंत टाके व समीर मानकर यांनी पंचनामा केला. ठाणेदार विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास बीट जमादार किसन धुर्वे करीत आहेत.