फोटो ०३एएमपीएच०१
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरखेड/तिवसा (अमरावती) : जिल्ह्यात दोन दिवसांत दोन युवा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. विचोरी व वाठोडा खुर्द येथे या घटना घडल्या.
शिरखेड लगतच्या विचोरी येथे एका ३० वर्षीय शेतकरी युवकाने विष घेऊन आत्महत्या केली. मनोज रामचंद्र मुळे असे मृताचे नाव आहे. १ जुलै रोजी कृषिदिनी ही घटना घडली.
मनोज मुळे यांनी वडिलोपार्जित दोन एकर शेतीत सोयाबीनची पेरणी केली होती. दहा एकर शेत लागवडीसाठी घेऊन त्यातसुद्धा पेरणी केली होती. पण, गेल्या काही दिवसांपासून पाऊस हुलकवणी देत असल्याने पेरलेल्या पिकाला मोड आली होती. पुढील पेरणी कशी करावी, या विवंचनेत मनोज मुळे यांनी राहत्या घरात विष प्राशन केले. याबाबतची माहिती शिरखेड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी पंचनामा केला. शुक्रवारी दुपारी मनोजवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व वडील असा परिवार आहे.
तिवसा तालुक्यातील वाठोडा खुर्द येथील एका विवाहित अल्पभूधारक शेतकऱ्याने राहत्या घरी विष घेऊन आत्महत्या केली. गजानन वसंत कुबडे (३२, रा. वाठोडा) असे मृताचे आहे. २ जुलै रोजी दुपारी १ च्या सुमारास घरी कुणीच नसताना विषारी औषध प्राशन केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नसले तरी कर्जापायी आत्महत्या केली असल्याचा सूर परिसरात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन चिमुकले मुले, आई-वडील आहेत. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.