अमरावती : कीटकनाशकांची फवारणी करताना झालेल्या विषबाधेमुळे सलग दोन महिन्यांत दोन शेतक-यांचा बळी गेला. कृषी विभाग टाळाटाळ करीत होता; मात्र वैद्यकीय अहवालाअंती दोघांचाही मृत्यू कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधेनेच झाला असल्याचे स्पष्ट झाले. या दोन्ही प्रकरणात शासकीय मदतीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माहितीनुसार, यंदा जानेवारीपासून आतापर्यंत कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान विषबाधा झाल्याचे १५३ रुग्ण दाखल झाले. यवतमाळ जिल्ह्यात २०, तर विदर्भात ३५ शेतक-यांचा मृत्यू झाल्यानंतर प्रामुख्याने हा प्रश्न चर्चेत आला. शासनाने ही बाब गंभीरतेने घेतल्यानंतर जिल्ह्यातदेखील अश्या घटनांचा शोध घेण्यास सुरुवात झाली. अशा प्रकारे एकाही शेतक-याचा मृत्यू झालेला नाही, यावर जिल्हा प्रशासन ठाम होते. मात्र, ७ आॅक्टोबरनंतर विविध रुग्णालयांकडून माहिती आल्यानंतर दोन महिन्यात दोन शेतक-यांचा मृत्यू विषबाधेने झाल्याची बाब जिल्हा प्रशासनाने तत्त्वत: मान्य केली आहे.१ जानेवारी ते ७ आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधीत १५३ विषबाधेचे रुग्ण दाखल झालेत व यापैकी दोन शेतक-यांचा मृत्यू झाल्याची माहिती कृषी विभागाने सामान्य रुग्णालयाच्या हवाल्याने दिली. यामध्ये माहुली जहागीर ठाण्याच्या हद्दीतील डवरगाव येथे प्रदीप आवारे यांचा २९ सप्टेंबरला व येवदा ठाण्याच्या हद्दीतील म्हैसपूर येथे किरण ठाकरे यांचा ७ आॅक्टोबरला विषबाधेने मृत्यू झाला. यापैकी आवारे यांच्या नावाने सातबारा आहे, तर ठाकरे यांच्या वडिलांच्या नावाने जमीन आहे. या दोन्ही प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून शासकीय मदत देण्यात येणार आहे.आॅक्टोबरमध्ये विषबाधेचे २९ रुग्णजिल्हा सामान्य रुग्णालयात १ आॅक्टोबरपासून कीटकनाशकांच्या फवारणीमुळे विषबाधेतून २९ रुग्ण दाखल झालेत. १ जानेवारीपासून आतापर्यंत १५३ रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकांच्या अहवालात नमूद आहे. खासगी रुग्णालयांमध्ये किती रुग्णांनी विषबाधेचा उपचार घेतला, याची नेमकी माहिती शासकीय यंत्रणेजवळ नाही.ही आहेत विषबाधेची कारणेयंदा कपाशीची झालेली वाढ ही माणसांच्या उंचीपेक्षा अधिक असल्याने या पिकावर फवारणी करताना हवेची दिशा बदलल्यास फवारा थेट शेतकºयांच्या चेह-यावर उडतो आणि नाकातोंडातून विष थेट शरीरात जाते. बॅटरीमुळे गतीने चालणा-या चायना स्प्रे पंपाचा वापर, अप्रमाणित व अतिशय जहाल कीटकनाशकांची फवारणी, यंदा सप्टेंबरपासूनच कडक उन्हाचे चटके असल्याने शेतक-यांना आलेल्या घामामुळे त्वचेच्या छिद्रातून कीटकनाशकाचा अंश शरीरात भिनतो आदी कारणांमुळे शेतक-यांना कीटकनाशकांची विषबाधा होते.कीटकनाशकांच्या फवारणीदरम्यान झालेल्या विषबाधेमुळे दोन शेतक-यांचा मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालाने हे स्पष्ट केले आहे. शासकीय मदत मिळण्यासाठी दोन्ही प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविण्यात आले आहेत.अनिल खर्चान,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, अमरावती
फवारणी प्रकरणातील 'ते' दोन शेतकरी कीटकनाशक विषबाधेचेच बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 4:47 PM