अमरावती : ग्रामसरक्षा दलाच्या तरुणांना पळवून लावण्यासाठी एका ५५ वर्षीय कथित चोराने त्याच्या परवानाप्राप्त बंदुकीतून दोन फायर केले. ही घटना रिद्धपूर ते डोमक रस्त्यावरील एका शेतात ६ जून रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास घडली.
शिरखेड पोलिसांनी याप्रकरणी आरोपी एजाजउल्ला खान नूरउल्ला खान (५५) व फैजान खान (२४, रा. दोघेही रिद्धपूर) यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३७९, ५११, ३२३, व आर्म्स ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपी एजाजउल्ला खान याचा शस्त्र परवाना रद्द करण्यात यावा, असा प्रस्ताव ग्रामीण पोलिसांकडून जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात येणार आहे.
एजाजउल्ला खान व फैजान खान यांनी ६ जून रोजी रात्री आष्टोली येथील सतीश काळे यांच्या गोठ्यातून गोऱ्हे चोरण्याचा प्रयत्न केला. गावातील एका महिलेने त्यांना पाहिले. तिने ती माहिती ग्राम सुरक्षा दलातील तरुणांना दिली. सदर चोरांचा फिर्यादी प्रशांत अढाऊ (३०, रा. आष्टोली) सह ग्राम सुरक्षा दलातील तरुणांनी पाठलाग केला. हे दोघे स्वत:च्या शेतातील झोपडीवर पोहोचले. त्यांच्यापाठोपाठ ग्राम सुरक्षा दलातील सहा तरुण पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी टॉर्चच्या प्रकाशात आरोपींना ओळखले.
तरुणांना पळवून लावण्याच्या उद्देशाने त्यांच्यापैकी प्रज्वल यास आरोपी एजाजउल्ला खान याने त्याच्याकडील परवानाप्राप्त बंदुकीच्या नळीने ढकलले. त्यामुळे त्याच्या डाव्या काखेत व्रण आला. प्रशांत अढाऊ याला आरोपी फैजान खानने काठी फेकून मारली. त्यामुळे तो किरकोळ जखमी झाला. अढाऊ व ग्राम सुरक्षा दलातील मुलांना पळवून लावण्याचे उद्देशाने आरोपी एजाज खान याने त्याच्या बंदुकीमधून दोन फायर केले. दुसरा फायर केल्यावर तो खाली पडला व त्याचे डावे मांडीवर मागील बाजूने त्याच्याच मालकीच्या व खाली पडलेल्या सत्तूरचा मार लागला. तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हे नोंदविण्यात आले. पुढील तपास शिरखेडचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल ठाकरे करीत आहेत.