वरूड : शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री होत असल्याची गोपनीय माहिती वरूड पोलिसांना मिळाली होती. यावरून स्थानिक जुना डायरा परिसरात धाडसत्र राबविले असता २ लाख ४७ हजार १०० रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला, तर दोन गुटखा तस्करांना अटक करण्यात आली. या कारवाईमुळे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.
पोलीस सूत्रानुसार गुटखा तस्कराचे नाव रज्जाक रहेमतुल्ला कच्छी (४६), मोहम्मद इम्रान रहेमतुल्ला कच्छी (३८), दोन्ही रा. गजानन मंदिरामागे, सल्फीनगर, वरूड असे आहे. अनेक वर्षांपासून गुटखा विक्रीचा व्यवसाय सुरू असून राज्य शासनाने गुटखा बंदी घातल्यानंतर अवैध गुटखा विक्रीला तालुक्यात उधाण आले होते. गुटखा तस्करी करणारे जाळे शहरात असल्याबाबत वरूड पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. यावरून एसीपी कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रदीप चौगावकर, एपीआय हेमंत चौधरी, पीएसआय कृष्णा साळुंके, शेषराव कोकरे, रवींद्र धानोरकर, सचिन भाकरे यांच्यासह वरूड पोलिसांनी बुधवारला सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास धाडसत्र राबविले. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. यामध्ये रुस्तम प्रीमियम गुटखा ४ मोठे पोते, २२ लहान कट्टे, एका पाऊचमध्ये ६५ पुड्या असा ८४ हजार ५०० पुड्या नग, किंमत १ लाख ६९ हजार रुपये, नजर प्रीमियम गुटखा ३ मोठे प्लास्टिक पोते ५८ हजार ५०० नग ५८ हजार ५०० रुपये, गोल्ड सुगंधित सुपारी ५ लहान कट्टे किंमत १९ हजार ५०० रुपये, असा एकूण २ लाख ४७ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला, तर दोघांना अटक करून आरोपीविरुद्ध भादंविचे कलम १८८, २७२, २७३, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात गुटखा तस्करी होत असून लाखो रुपयांचा गुटखा विकला जात असल्याचे या कारवाईमुळे सिद्ध झाले असून अवैध गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पुढील तपास वरूड पोलीस करीत आहेत.