फोटो पी १८ पापळ
पापळ : पापळ परिसरात १७ जून रोजी दुपारी ४ ते ६ दरम्यान मुसळधार पाऊस कोसळला या पावसाच्या पाण्याने परिसरात घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही शेतकऱ्यांनी केलेली पेरणी दडपल्याचे चित्र दिसत आहे.
१७ जूनला दुपारी ४ दरम्यान पापळ परिसरात पावसाने सुरुवात केली. तब्बल दोन तास मुळसधार पाऊस कोसळला या पावसामुळे पापळ, पिंप्री, निपाणी, सुकळी, काजना, राजूना, कोव्हळा (जेटेश्वर), पिंप्री गावंडा, धर्मापूर, पळसमंडळ खेड, हिवरा, पुसनेर, वठाळा, पिंप्री पोच्छा आदी गावात पुरपरिस्थिती निर्माण झाली. या सतत धार पावसाचे पाणी नदीनाल्यात न साठवल्याने या पाण्याने या परिसरातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. तसेच पुराचे पाणी गावात शिरल्याने अनेक घरात पाणीच पाणी होते. या अतिवृष्टीने पापळ परिसरातील गावातील घरांचे शेतीचे बांधाचे, पेरलेले बियाणे सुद्धा वाहुन गेले तर काहीचे बियाणे दडपल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. तरि शासनाच्या वतीने पापळ परिसरातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करुन नुकसानग्रस्तांना मदत द्यावी अशी मागणी सर्व सरपंच, नागरिकांनी केली आहे.