अमरावती : पेटता दिवा खाली पडल्याने लागलेल्या भीषण आगीत दोन झोपड्या जळून खाक झाल्या. ही घटना शुक्रवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नवाथे नगराजवळील वसंतराव नाईक न. २ मधील झोपडपट्टीत घडली असून परिसरातील नागरिकांनीच पाण्याचा मारा करून आगिवर नियंत्रण मिळविले. विशेष म्हणजे या दोन्ही झोपड्या भाडे तत्त्वावर होत्या. नवाथे नगर नाल्याशेजारीच वसंतराव नाईक झोपडपट्टी असून तेथे सुमारे ३०० च्यावर झोपड्या आहेत. किसन तुकाराम लसनकर यांनी खत्री व पाटील नामक दोन वृध्दाना त्याच्या झोपड्या भाडे तत्त्वावर दिल्या आहे. शुक्रवारी सकाळी खत्री व पाटील हे दोघेही कामानिमित्त बाहेर गेल्यावर त्यांनी झोपडीच्या दारांना कुलूप लावले होते. दरम्यान, दुपारी अचानक घरातून आगीचे लोट बाहेर पडत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली. तत्पूर्वी शेजारी राहणाऱ्या गवई अन्य नागरिकांनी आग विझविण्याचे प्रयत्न सुरु केले. काही वेळातच अग्निशमन विभागाचे फायरमन सैय्यद अनवरसह अन्य कर्मचाऱ्यांनी दोन पाण्याचे बंब घेऊन घटनास्थळी पाचारण केले. तसेच राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक बी.पी.राठोड व पोलीस शिपाई सुनिल अंबुलकर यांच्यासह चार्ली कमांडोही तेथे पोहचले. मात्र, तोपर्यंत नागरिकांनी आगिवर नियंत्रण मिळविले होते.
भाडे तत्त्वावरच्या दोन झोपड्या भस्मसात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2016 12:46 AM