एलसीबीची कारवाई : देशी कट्ट्यासह चार काडतूस जप्तअमरावती : मध्यप्रदेशासह राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी सायंकाळी अटक केली. शशिकांत मारोती बागडे (२५,रा.अकोला) व पवन रामदास आर्या (३०,रा.इंदौर) अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याजवळून देशी कट्ट्यासह चार जिवंत काडतूस, ७० हजारांचे सोन्याचे दागिने व गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण १ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस सूत्रानुसार, २० डिसेंबर २०१६ रोजी गुप्त माहितीवरून दर्यापूरचे ठाणेदार नितीन गवारे यांनी पोलीस पथकासह साईनगरात नाकाबंदी केली. दरम्यान एमएच १९-टीयू-९७९५ हे वाहन सोडून काही अज्ञात आरोपी पसार झाले. या वाहनात घरफोडीचे साहित्य, चाकू व मोबाईल जप्त करण्यात आला होता. याप्रकरणाचा दर्यापूर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंविच्या कलम ३८०, ५११ अन्वये गुन्हा नोंदविला. नंतर या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला. या गुन्ह्याच्या तपासानंतर दोन्ही आरोपींची नावे निष्पन्न झाली. हे दोन्ही गुन्हेगार सराईत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक लखमी गौतम यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक आशिष बोरकर यांच्या नेत्तृत्वात पथक तयार करण्यात आले. दरम्यान रविवारी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी लोणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हिवरा फाट्यावर नाकाबंदी केली. पोलिसांनी अकोला मार्ग जाणाऱ्या एका कारची तपासणी केली असता त्यामध्ये दोन्ही आरोपी मिळून आले. पोलिसांनी कारची झडती घेतली असता आरोपीजवळ देशी कट्ट्यासह जीवंत काडतुस पोलिसांनी जप्त केले. या आरोपीविरुद्ध अकोला, अमरावती, जळगाव, नागपूर तसेच मध्यप्रदेश व राज्यातील घरफोडी, वाहन चोरी व अन्य गंभीर गुन्ह्यांची नोंद असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. या कारवाईत पोलीस निरीक्षक अनिल लाड, दिनकर कदम, पीएसआय आशिष बोरकर, पोलीस हवालदार शेंडे, गजानन मस्के, गजेंद्र ठाकरे, दिनेश कनोजीया, चालक राजेश काळेंचा सहभाग होता. (प्रतिनिधी)
दोन कुख्यात अटकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2017 12:14 AM