अमरावती : भरधाव कार उलटून झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघांचा मृत्यू झाला. तर तिघे जखमी झाले. हा अपघात ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास खोलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील म्हैसपूर फाट्यावर घडला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अनिकेत प्रवीण भुगूल (२४) व कैलास बाळू फुटाणे (२२, दोघेही रा. कामनापूर, ता. भातकुली) अशी मृतांची नावे आहेत.
अनिकेत व कैलास हे अन्य तीन मित्रांसह शनिवारी रात्री एमएच २७ बीवाय ४६१३ या कारने कामनापूरहून शेगावला जात होते. मार्गात म्हैसपूर फाट्यावरील वळण रस्त्यावर चालकाचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कार रस्त्यावर उलटली. जवळपास २० ते २५ मीटर कार फरफटत जावून शेतात जाऊन पडली. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्यावर खोलापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. माहिती मिळताच ठाणेदार संघरक्षक भगत ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. तातडीने रुग्णवाहिका बोलावून जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले. डॉक्टरांनी कैलास याला मृत घोषित केले. तर अनिकेतला नागपूरला नेत असताना वाटेतच त्याचाही मृत्यू झाला. या अपघातातील अन्य जखमींवर उपचार सुरू आहेत. अपघातात कार चकनाचूर झाली.
...म्हणून वाचले जीव
कुण्यातरी प्रत्यक्षदर्शीने तो अपघात डोळ्याने पाहिल्याने त्याने खोलापुर पोलीसांना तातडीने माहिती दिली. अपघात भीषण असल्याची माहिती मिळताच खोलापूरचे ठाणेदार संघरक्षक भगत हे पोहोचले. त्यांनी तत्काळ १०८ रूग्णवाहिकेला पाचारण करून अपघातग्रस्तांना रूग्णालयात हलविले. अपघातग्रस्त भरधाव कार रोडपासून आत सुमारे २० ते २५ मीटर अंतरावर जाऊन पडल्याने रात्रीच्या वेळी ती किंवा जखमी कुणालाही दिसणे शक्य नव्हते. परिणामी, अपघातग्रस्त रात्रभर तेथेच पडून राहण्याची भीती होती. मात्र, प्रत्यक्षदर्शीने त्वरेने कळविल्याने तातडीचे बचावकार्य शक्य झाल्याचे ठाणेदार भगत म्हणाले.