अमरावती : जिल्ह्यात शनिवारी दुपारी चारचे सुमारास वीज पडल्याने दोन व्यक्ती ठार, पाच महिला जखमी झाल्या आहेत. शिवाय वीज पडून तीन म्हशी, १२ शेळ्या ठार झाल्या. वादळासह आलेल्या या पावसाने काढणीच्या हंगामात सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यात शनिवारी पहाटे चार वाजता व दुपारी ४ नंतर विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. चिखलदरा शहरातील अप्पर प्लेटो स्थित प्रोस्पेक्ट पॉईंट जवळ शनिवारी सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान वीज कोसळून म्हशी चारत असताना तीन म्हशींसह पशुपालक ठार झाला तर अन्य घटनेत वीज कोसळून १२ शेळ्यांचा मृत्यू झाला यात गुराखी जखमी झाल्याची माहिती आहे. गुलाब लक्ष्मण खडके (६५ रा. पाढरी) असे मृताचे नाव आहे.
दुसऱ्या घटनेत शनिवारी सायंकाळी तिवसा तालुक्यातील इसापूर येथे गणेश ठाकरे यांच्या शेतातून सोयाबीन मळणीचे काम करुन परत येत असतांना वीज पडून ओजाराम अमरलाल मसराम ( ३५, रामनगर, मध्यप्रदेश) हा युवक जागीच ठार झाला तर सोबत असलेल्या नीलम लालसिंग धुर्वे (१८), सुनीता सुजाण धुर्वे (३८), संगीता संजय मसराम (१७), रमाबाई येनुज सरपाण (१८), पूनम सुजाण घुर्वे ( १०) जखमी झाल्या आहेत. जखमींवर तिवसा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गुरुकुंज मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा पुण्यतिथी महोत्सव सुरू आहे. महोत्सव परिसरात वादळासह पावसाने मंडप कोसळला. शिवाय या पावसाने कापूस भिजला व सोयाबीनच्या गंजी पावसाने भिजल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.