परतवाडा : देशी दारूचे दुकान फोडून २ लाख ५ हजार ७६५ रुपये किमतीच्या देशी दारूच्या ७९ पेट्या चोरणाऱ्या पाच चोरट्यांना अवघ्या २४ तासांत परतवाडा पोलिसांनी अटक केली. चोरलेला सर्व मुद्देमाल पोलिसांनी चोरट्यांकडून हस्तगत केल्या आहेत.
राजेंद्र जयस्वाल (६८, रा. सदर बाजार परतवाडा) यांनी २३ जून रोजी परतवाडा पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई पोलिसांकडून करण्यात आली. २२ जूनच्या रात्री कांडली येथील नाईक प्लॉट देशी दारूचे दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी हा दारूचा साठा पळविला होता. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंविचे कलम ४६१ व ३८० अन्वये गुन्हा दाखल केला.
ठाणेदार सदानंद मानकर यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाने तपासचक्र वेगाने फिरवित नागेश परीवाले (२१ ), विशाल परीवाले (२० ), प्रेम काकडे (२६), सचिन मुंडवाइक (२८, सर्व रा. नाईक प्लॉट, कांडली) व रोहित ठाकूर (२०, रा. भोईपुरा, कांडली) या पाच आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली.
पोलीस उपनिरीक्षक मनोज कदम, परीविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक विष्णुपंत राठोड, पोलीस उपनिरीक्षक गोळे, सहायक उपनिरीक्षक मोहन मोहोड, जमादार सुभाष तराळ, प्रमोद चौधरी, नायक पोलीस कॉन्स्टेबल गणेश बेलोकार, जयसिंग चव्हाण, दीपक डाहे, कमलेश मुराई, दीपक राऊत, विवेक ठाकरे, शुभम मार्कंड, नाजिम शेख, मंगेश फुकट, रमण हिवराळे यांनी पार पाडली.