लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : तालुक्यातील मौजा जरूडमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या बाजूला आडजातीची २०.९९१ घनमीटर लाकडे पडीक जागेत आणून ठेवली होती. या परिसरात वृक्षतोड सुरू असल्याची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाल्यावरून घटनास्थळ गाठले. कापून ठेवलेल्या लाकडाचा पंचनामा करून लाकडे जप्तीची कारवाई करण्यात आली. अवैध लाकडाची १ लाख ९९ हजार रुपये किंमत असून, अद्याप कुणीही मालक पुढे आला नसल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, मौजा जरूड परिसरात जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठा योजनेच्या टाकीमागे खुल्या पडीक जागेमध्ये अवैध वृक्षतोड करून लाकडे आणून ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी दुपारी वनपरिक्षेत्र अधिकारी पुष्पलता बेंडे, शेकदरी वर्तुळाच्या वनपाल देवश्री नवले, वनरक्षक मंगेश जंगले, दिलीप वाघमारे, नवेद काझी, वाहनचालक आकाश मानकर, वनकर्मचारी युवराज कनाठे, सतीश गायकवाड यांच्या पथकांनी जाऊन घटनास्थळावरील अवैध लाकडाचा पंचनामा केला. मोजमाप केले असता, सदर लाकडे २०.९९१ घनमीटर होती. अंदाजे किंमत १ लाख ९९ हजार एवढी असून यामध्ये निंब, बाभूळ, हिवर, शिवण, चिचोरा, बेहाडा जातीची आडजात वृक्ष होते. ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरूच होती. वृक्षतोड या परिसरात होत असल्याचे चित्र आहे. याबाबत कुणीही व्यक्ती मालक म्हणून पुढे आली नसल्याने नेमकी ही लाकडे कुणाची, हा प्रश्न आहे. तथापि, याच सुमारास आरागिरणीचालक लाकडाच्या साठ्याची टेहळणी करताना दृष्टीस पडले. गुन्हा नेमका कुणावर दाखल झाला, याबाबत माहिती मिळू शकली नाही.