अमरावती : खुनाचा प्रयत्न व खंडणीसाठी केलेल्या अपहरणाच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी पुण्याहून अमरावतीत आश्रयास आलेल्या दोन कुख्यात गुन्हेगारांना अमरावती पोलिसांनी अटक केली. १२ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांना आशियाड कॉलनी चौकातून एका कारमधून ताब्यात घेण्यात आले. दोघांनाही पुणे ग्रामीण पोलिसांच्या सुपुर्द करण्यात आले. ते पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील गुन्हेगारे टोळीचे सदस्य आहेत.
विपुल उत्तम माझिरे (२६, रा. रावडे ता. मुळशी पो. स्टे पौड पुणे ग्रामीण) व प्रदीप उर्फ पंकज धनवे (२७, रा सिंहगड रोड दांडेकर पुल, दत्तवाडी पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेेत. तर संतोष धुमाळ (रा मुळशी पूणे) हा तिसरा आरोपी पोलिसांची चाहुल लागताच पळून गेला. पुण्याच्या पौड पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या खुनाचा प्रयत्न व खंडणीसाठी अपहरणाच्या गुन्हयातील संतोष धुमाळ व त्याचे इतर दोन साथीदार हे पूणे येथून पळून अमरावती येथे आश्रयाला आले आहेत, अशी माहिती पुणे ग्रामीण पोलिसांकडून अमरावती शहर पोलिसांना ९ नोव्हेंबर रोजी देण्यात आली होती. ती जबाबदारी गुन्हे शाखा युनिट एककडे सोपविण्यात आली.
गु्न्हे शाखा युनिट एकने आरोपीच्या शोधासाठी अमरावती शहरातील हॉटेल, लॉज तसेच आरोपींच्या संभाव्य राहण्याच्या ठिकाणांचा शोध घेतला. दरम्यान १२ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० च्या सुमारास स्थानिक गुंड सागर खिराडे याच्यासोबत अन्य शहरातील तीन व्यक्ती कारमधून फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. ती कार आशियाड कॉलनी चौकात ट्रेस झाली. सागर खिराडे हा त्याच्या कारसह दिसून आला. पोलिसांना पाहताच खिराडे हा तेथून अंधाराचा फायदा घेवून एका इसमासह पळून गेला. तर विपुल व प्रदीप हे दोन आरोपी गु्न्हे शाखेच्या हाती लागले.
दोन दिवसांपासून अमरावतीत मुक्कामी
आरोपी हे दोन दिवसांपासून अमरावतीच्या शेगाव परिसरात राहत होते. त्यांना अमरावती येथील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सागर खिराडे याने आश्रय दिल्याची कबुली अटक आरोपींनी दिली. पळून गेलेला संतोष धुमाळ व अटक आरोपी विपुल माझिरे हे मोक्का केसमधील आरोपी असून दोन ते तीन महिन्यांपुर्वीच ते कारागृहातून सुटलेत. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेडडी यांच्या नेतृत्वात वरिष्ठ पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले व सपोनि मनीष वाकोडे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.