लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाभरात श्वांनांनी उच्छाद मांडल्याचे चित्र आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात जुन व जुलै या दोनच महिन्यात तब्बल १ हजार ८९ श्वानदंशाचे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात दररोज सरासरी १५ ते २० जणांना श्वानांनी चावा घेतल्याच्या घडत असल्याचे निदर्शनास येत आहे.अमरावती शहरात पाच हजारांवर श्वान आहेत. जिल्ह्यात ही संख्या १० हजारांवर जाते. वर्षभरात श्वानांनी चावा घेतल्याचे सातशे ते आठशे रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. मात्र, जून व जुलै महिन्यात श्वानदंशाच्या घटना अधिकच वाढल्या. दरवर्षी श्वानांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे काही वर्षांपासून जिल्ह्यात श्वानदंशाचे रुग्ण सतत वाढत आहेत. श्वानांनी चावल्याचा सर्वाधिक फटका लहान मुलांना बसला असून, खेळता-खेळता श्वान अचानक अंगावर धावल्याचे आढळून आले. पावसाळ्याच्या दिवसांत श्वान चावल्याचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आले. दोन महिन्यात १०८९ जणांना श्वानाने चावा घेतलेले रुग्ण जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाले. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश भागात श्वानांनी उच्छाद मांडल्याचे दिसून येत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना अॅन्टी रॅबीज इंजेक्शन देण्यात येत असून, उपचारानंतर रुग्ण बरे झाले आहेत.बाईकस्वार, लहान मुलांच्या जीविताला धोकाअलीकडे श्वानांचे झुंड वराहाचा पिछा करीत त्यांना फस्त करतात. अन्नाच्या कमतरतेमुळे श्वान मास भक्षणाकडे वळल्याचे दिसत आहे. वराह खाणारे श्वान मानवी सानिध्यात राहतात. त्यामुळे श्वान व वराहातील संसर्ग मानवी आरोग्यास घातक ठरू शकतो. त्यातच काही श्वान मोटरसायकलीवर भुंकत पाठलाग करतात. त्यामुळे मोटरसायकलस्वार धूम ठोकतात, अशा स्थितीत लहान मुले खेळत बागडत असताना अपघात होण्याची शक्यता बळावते. या श्वानांचा वावर मुलांच्या जिवाला धोका निर्माण करणारा ठरू शकतो.का चवताळतात श्वानपावसाळ्यात श्वानांचा 'मेटींग सिझन' असतो. सततच्या पावसामुळे श्वानांना खायला अन्न मिळत नाही. त्यातच काही श्वान अन्नाच्या किंवा मेटींगच्या शोधात परिसर बदलतात. अनेकदा महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागातील कर्मचारी मोकाट श्वानांना पकडून शहराबाहेर सोडतात. अशा परिस्थितीत श्वान चवताळण्याची शक्यता बळावते. अशाच स्थितीत श्वान मानवी संपर्कात आल्यास तो चावा घेतो.चार श्वानांना 'रॅबीज'गेल्या काही दिवसांत शहरातील वसा संस्थेला रॅबीजचे चार श्वान आढळून आले. त्यांनी याबाबत महापालिकेला माहिती दिली आहे.
दोन महिन्यात १०८९ नागरिकांना श्वानदंश, रोज १५ ते २० जण जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2019 10:29 PM