वन विभागाच्या रेस्क्यू पथकाची कारवाई, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोड येथील घटना
अमरावती : संरक्षण कडठे नसलेल्या विहिरीत दोन नीलगायी पडल्या. यात एकाचा मृत्यू झाला, तर एकाला जीवदान मिळाले. ही घटना नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील सालोड येथील श्रीधर इंजळकर यांच्या शेतात गुरुवारी घडली. पाण्याच्या शोधात नीलगायी विहिरीत पडल्या असाव्यात, असा प्राथमिक अंदाज वन विभागाने वर्तविला आहे.
प्राप्त माहितीनुसार, सालोड येथील श्रीधर इंजळकर यांच्या शेतात असलेल्या ४० फूट खोल विहिरीत दोन नीलगायी पडल्याची माहिती वन विभागाच्या रेस्क्यू पथकाला गुरुवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मिळाली. त्यानुसार रेस्क्यू पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता ४० फूट खोल विहिरीत दोन नीलगाय पडल्याचे दिसून आले. यात फिजिकलरीत्या रेस्क्यू पथकाने एका नीलगायीचा जीव वाचविला. मात्र, एका नीलगायीचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही कारवाई वनपाल सुरेश मनगटे, वनरक्षक अमोल गावनेर, वनमजूर मनोज माहूलकर, सुधीर काळपांडे, वैभव राऊत, आसीफ पठाण आदींनी केली.