अमरावती : पावसाचे म्हणून ओळखले जाणारे नऊपैकी दोन नक्षत्र कोरडे गेले आहेत. आता गुरुवारपासून आर्द्राला सुरुवात होत आहे. सुख-समृद्धीचे प्रतीक असणारा मृगाचा हत्ती कोरडाच राहिल्याने शेतकरी आता आर्द्राच्या मेंढ्याकडे आशेने पाहत आहेत.
नक्षत्र व त्यांचे वाहन यावरून पावसाचे ठोकताळे बांधण्याची पद्धत पूर्वापार चालत आलेली आहे व यासोबतच शेतकरी आता वेधशाळेचाही अंदाज घेत असतात. यानुसार २५ जूनपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात होत असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. प्रत्यक्षात ८० ते १०० मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करूच नये, अन्यथा नुकसान संभवते, त्यामुळे पुरेसी ओल जमिनीत झाल्यावरच साधारणपणे १ जुलैनंतरच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.