अमरावती : दी अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ४८ उमेदवार रिंगणात आहेत. या उमेदवारांना २३ सप्टेंबर रोजी चिन्ह वाटप झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडणार आहे. जिल्हा बँकेचे या निवडणुकीत सहकार व परिवर्तन ही दोन पॅनल आमने-सामने आले आहेत. अशातच काही अपक्षांनीही मैदानात उडी घेतल्यामुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे.
जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत २१ पैकी ४ संचालक अविरोध निवडून आले आहेत. त्यामुळे उर्वरित १७ जागांसाठी ४८ उमेदवार मैदानात आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या उमेदवारांची यादी घोषित केली आहे. त्यानुसार २४ सप्टेंबरपासून जिल्हा बँकेच्या प्रचाराच्या रणधुमाळीला वेग आला आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांपर्यंत पोहोचून मतदानाचा जोगवा मागत आहेत. अनेक मतदारांकडून मत मिळवण्यासाठी विविध प्रकारचे फंडेसुद्धा वापरले जात आहेत. जिल्हा बँकेसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून ५ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे.
बॉक्स
आठ मतदारसंघात होणार थेट लढत
१७ संचालकांपैकी महिला राखीव या मतदारसंघातून दोन संचालक निवडले जाणार आहे. त्यामुळे मैदानातील उमेदवारांची संख्या अधिक असली तरी त्यासाठीचे मतदार मात्र १६ आहेत. त्यापैकी निम्मे मतदारसंघात एकास एक लढत असून उर्वरित आठ मतदारसंघात तीन ते सहा उमेदवार मैदानात उभे ठाकले आहेत.
बॉक्स
मेळघाटचे दोन्ही मतदारसंघ सर्वात लहान
मेळघाटातील धारणी व चिखलदरा हे दोन्ही मतदारसंघ मतदार संख्येच्या निकषानुसार सर्वात लहान आहे. चिखलदारा सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात केवळ १६, तर धारणी सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात १९ मतदार आहेत. सर्वाधिक १,६८७ मतदार महिला एससी, एसटी, व्हीजे एनटी आणि ओबीसी या जिल्हाव्यापी मतदारसंघात आहेत.
बॉक्स
बबलू देशमुख दोन मतदारसंघातून उमेदवार
सहकार पॅनलचे नेते तथा बँकेचे माजी अध्यक्ष बबलू देशमुख हे या निवडणुकीत दोन मतदारसंघातून लढत देत आहे. चांदूर बाजार सेवा सहकारी सोसायटी मतदारसंघात त्यांना राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याशी सामना करावा लागणार आहे. ओबीसी संवर्गाच्या जिल्हाव्यापी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके यांच्याशी लढत होणार आहे.