मोर्शी, दि. 2- व्यावसायिक वादामुळे मोर्शीत मशिदीबाहेर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी बकरी ईदच्या दिवशी नमाजसाठी जात असताना गोळीबार करण्यात आला. सय्यद नूर सय्यद मुसा (५२) व सय्यद शकील सय्यद भुरू (४०) अशी जखमींची नावं आहेत. याप्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. जखमींना उपचारासाठी अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुका मुख्यालय असलेल्या मोर्शी येथे सय्यद नूर सय्यद मुसा यांच्या कुटुंबीयांचा भंगारचा व्यवसाय आहे. तर अलीम खान व सलीम खान या पिता-पुत्रांचा जुन्या लाकडी दरवाजे, खिडक्यांसह भंगारचा व्यवसाय करतात. तीन महिन्यांपूर्वी झालेल्या व्यावसायिक वादातून सय्यद नूर याने अलीम खान याला मारहाण केली होती. यात तो जखमी झाला होता. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सय्यद नूरवर गुन्हा दाखल झाला व त्याची कारागृहात रवानगी झाली होती. दरम्यान शुक्रवारी सय्यद नूर यास जामीन मिळल्याने तो आपल्या घरी परत आला होता. शनिवारी बकरी ईद असल्यामुळे शहारातील बहुतांश मुस्लिम बंधू चांदूरबाजार मार्गावरील मशिदीत जात होते. याच वेळी अलीम खान याचा निकटवर्ती असलेल्या सादिक खान आबीद खान याने साथीदारांच्या सहाय्याने सय्यद नूर सय्यद मुसा व सय्यद शकील सय्यद भुरू या दोघांवर देशी कट्ट्याने गोळीबार केला. यात सय्यद नूर सय्यद मुसा याच्या कमरेच्या मागील बाजूस गोळी लागली. सय्यद शकील सय्यद भूरू यांच्यावर देशी कट्ट्याने हल्ला केल्याने त्यांच्या डोक्यावर जखम झाली.
या घटनेनंतर परिसरात प्रचंड खळबळ माजली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीदेखील येथे मोठी गर्दी जमली. माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी घटनास्थळी भेट दिली. परस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी अतिरिक्त कुमूक मागविण्यात आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. त्यांच्यावर पुढील कारवाई सुरू आहे.