अमरावती : चांदुरबाजार तालुक्यातील बेलज येथील एका ७३ वर्षीय महिलेला मारहाण करून तिच्याकडील सोन्याचा ऐवज लुटणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. ४ जून रोजी दुपारी त्या दोन चोरांना अचलपूरातून अटक करण्यात आली. मोहम्मद इद्रिस मोहम्मद इशाख (३२, रा. अशरफपुरा अचलपूर) आणि मोहम्मद जबी फरात मोहम्मद जाकिर (२३, रा. अलकरीम कॉलनी, अचलपुर) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून दोन मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली.
पोलिसांनुसार, १ जून रोजी बेलज येथे ही घटना घडली होती. तेथील कांता महादेवराव ठाकरे (७३) या घरी एकट्या असताना दोन लुटारूंनी त्यांच्या घरी जावून पिण्यासाठी पाणी मागितले. कांता ठाकरे या पाणी आणण्यासाठी आत गेल्यावर घरी कुणी नसल्याचे पाहून लुटारूंनी त्यांच्या कानातले आणि गळ्यातील पोत असा ६ हजारांचा ऐवज हिसकावून तेथून पळ काढला होता. यावेळी लुटारूंसोबत झालेल्या झटापटीत कांता ठाकरे या जखमी देखील झाल्या होत्या. या प्रकरणी त्यांच्या तक्रारीवरून सरमसपुरा पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास आरंभला.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथकही या गुन्ह्यांचा समांतर तपास करीत होते. तपासादरम्यान त्या गुन्ह्यात अचलपूर येथील रहिवासी मोहम्मद इद्रिस व मोहम्मद जबी फरात यांचा हाथ असल्याचे समोर आले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
यांनी केली कारवाई
दोन्ही लुटारूंना पुढील कारवाईसाठी सरमसपुरा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक तपन कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर धोंडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पवार, पोलीस उपनिरीक्षक नितीन चुलपार, संतोष मुंदाने, युवराज मानमोठे, रवींद्र बावने, स्वप्निल तंवर, रवींद्र वऱ्हाडे, पंकज फाटे, सागर नाठे, सागर धापड, रितेश वानखडे, चेतन गुल्हाने, मंगेश मानमोठे, संजय प्रधान यांनी केली.