लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : नजीकच्या काटआमला गावाजवळ नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले प्रवाहाबरोबर वाहत गेले, तर वडील व आजोबा बचावले. हृदय हेलावणारी ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडली. तब्बल दहा तासांनंतर मुलीचा मृतदेह हाती लागला, तर मुलगा अद्यापही बेपत्ता आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.बहाद्दरपूर येथील जगदीश चौरे (३५) हे मुलगी धनश्री (११), मुलगा नैतिक (७) व वडील मारूती चौरे (६०) यांसह बुधवारी दुचाकीने बडनेऱ्याला आले होते. मुलांची शाळा पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्यासाठी शालेय साहित्य घेतले आणि दुचाकीने गावाकडे निघाले. रात्री ८ वाजता ते काटआमलाच्या नाल्यावरील पुलानजीक पोहोचले. पाऊस सुरू असल्याने या पुलावरून पाणी वाहत होते. नेहमीचा रस्ता आहे; सहज निघून जाऊ, या बेतात जगदीशने दुचाकी नेली. मात्र, नाल्यावर नेमकी ती घसरली व हे चारही जण नाल्यात पडले आणि प्रवाहात सापडले. जगदीश चौरे व त्यांचे वडील कसेबसे काठावर आले; मात्र अंधारात दोन्ही मुले वाहत गेली. ही वार्ता जवळपासच्या गावात पोहोचताच रात्रीपासूनच गावकºयांनी शोधमोहीम राबविली. तब्बल दहा तासानंतर धनश्रीचा मृतदेह दोन किलोमीटर अंतरावर पाण्यात आढळला. मात्र, नैतिकचा मृतदेह अद्याप सापडला नाही. याप्रकरणी बडनेरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.परिसरातील काटआमला, बहाद्दरपूर, उत्तमसरा, परलाम, गणोरी येथील लोकांनी शोधमोहीम सुरू ठेवली आहे. गुरूवारी सकाळी भाजप प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी शोकमग्न कुटुंबाची भेट घेतली.शोध व बचाव पथक बेपत्ताजिल्हाधिकारी कार्यालयाचे शोध व बचाव पथक या घटनेच्या ठिकाणी पोहोचले नव्हते. बडनेराचे ठाणेदार शरद कुळकर्णी, आसोरे व कर्मचारी, तलाठी एस.एस. गिल, महापालिका अग्निशमन दलाचे चार कर्मचारी व जवळपासच्या चार ते पाच गावांतील लोक रात्री ८ पासून दुसऱ्या दिवशी शोध घेत होते. या बाबीची दखल शोध व बचाव पथकाला घ्यावीशी वाटली नाही. याचा संताप गावकऱ्यांमध्ये होता.इसमाने चौघांना वाचविण्यासाठी घेतली उडीज्यावेळी हे चौघेही नाल्यात पडले, त्यावेळी काही लोक वाहत्या पाण्यामुळे थांबले होते. चौघे नाल्यात पडल्याचे पाहून बहाद्दरपूरचे पुरुषोत्तम सुभेदार यांनी नाल्यात उडी घेतली व चौघांनाही वाचविण्याचा प्रयत्न केला. पाण्याच्या जोरदार प्रवाहात मुलगा वाहत जात असताना पुरुषोत्तमच्या हाती त्याचे शर्ट लागले. यादरम्यान पुरुषोत्तमला पाण्यात वाहून आलेल्या एका झुडुपाचा मार डोक्याला बसला. यामुळे नैतिक हातातून निसटला आणि पुढे वाहत गेला.
दोन चिमुकले पुरात वाहिले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 1:01 AM
नजीकच्या काटआमला गावाजवळ नाल्याच्या पुलावरून वाहणाऱ्या पाण्यात दुचाकी घसरल्याने दोन चिमुकले प्रवाहाबरोबर वाहत गेले, तर वडील व आजोबा बचावले. हृदय हेलावणारी ही घटना बुधवारी रात्री ८ च्या सुमारास घडली.
ठळक मुद्देकाटआमला पुलावरील घटना : शाळा पाहून घरी येत होते परत