धामणगाव रेल्वे : स्वस्त धान्य वितरण करताना तीन स्वस्त धान्य दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात कुटुंबाला ५० लाखांच्या मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे धूळखात पडला आहे. जिल्ह्यातील दोन हजार स्वस्त धान्य दुकानदारांना अद्यापही कोरोनाची लस न मिळाल्याने या दुकानदारांकडून नाराजी व्यक्त होत आहे.
भातकुली तालुक्यातील एका स्वस्त धान्य दुकानदाराचा ४ ऑगस्ट रोजी कोरोनाने मृत्यू झाला तसेच त्यांच्या आईचेही कोरोनामुळेच निधन झाले. जिल्ह्यात तीन ठिकाणी अशा घटना घडल्या. शासनाने अद्यापही या कुटुंबाला एक रुपयाची मदत दिली नाही. शासनाच्यावतीने नियमित धान्य, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करण्यात आले. आजही केले जाते. मात्र, कुठल्याही स्वस्त धान्य दुकानदारांना सुरक्षा किट किंवा सॅनिटायझर वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदार व त्यांचे कुटुंबीय आजही असुरक्षित आहेत.
कोरोनाकाळात इतर कोरोनायोद्ध्यांप्रमाणे स्वस्त धान्य दुकानदारांनी जिवाची पर्वा न करता गरीब जनतेला वेळेवर स्वस्त धान्य दिले. आजही इमानेइतबारे हे स्वस्त धान्य दुकानदार सेवा बजावत असताना, कोरोनाची लस या स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणे गरजेचे आहे. मात्र, महसूल व आरोग्य विभागाकडून या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.
कोट
आम्ही गत एक वर्षात कुटुंबाची पर्वा न करता शासनाने राबविलेल्या प्रत्येक उपक्रमात सहभाग घेतला. प्रत्येक कार्य प्रामाणिकपणे करीत असताना, कोरोनाची लस देण्यात आली नाही. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या संचालकांच्या कुटुंबालाही अद्याप शासनाने मदत दिली नाही.
- मिलिंद पहाडे, तालुका संघटक, स्वस्त धान्य दुकानदार संघटना, धामणगाव रेल्वे