लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महापालिका क्षेत्रात आता सर्वांसाठी घरे प्रकल्पांतर्गत २८०० घरकुलांपैकी दोन हजार घरकुलांचे काम पूर्ण झाली असल्याने आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेला हा प्रकल्प राज्यात अव्वल ठरला आहे. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ‘सर्वांसाठी घरे’ हा प्रकल्प मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने या विभागाची लगबग सुरू आहे. या प्रकल्पात एकूण चार घटक आहेत. यापैकी आर्थिक दुर्बल घटकांसाठी असलेल्या घटक क्रमांक ४ मध्ये आतापर्यंत २८०० लाभार्थींना कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. सद्यस्थितीत यापैकी दोन हजारांवर घरकुलांची कामे पूर्णत्वाला गेली आहेत. महापौर चेतन गावंडे व आयुक्त प्रशांत रोडे यांच्या पाठपुराव्यामुळे या योजनेत अमरावती महापालिका राज्यात अव्वल ठरली असल्याची माहिती उपअभियंता सुनील चौधरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.लाभार्थींना या घटकामध्ये ३० चौ.मी. चटई क्षेत्राचे बांधकाम करावयाचे आहे. बांधकामाचा अंदाजे खर्च सहा लाखांचा आहे व यामध्ये लाभार्थींना ३.५० लाखांचा खर्च करावा लागत आहे. यामध्ये प्लिंथ पूर्ण झाल्यावर एक लाख, स्लॅब लेव्हलवर एक लाख, वीज जोडणी, शौचालय, छपाई व फरशी पूर्ण झाल्यावर ५० हजारांचे अनुदान लाभार्थींच्या बँक खात्यात जमा करण्यात येत असल्याची माहिती चौधरी यांनी दिली. घटक-१ मध्ये महापालिका हद्दीतील ६९ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये शासनाच्या विविध विभागांची एनओसी प्राप्त झाल्यानंतर आतापर्यंत १० झोपडपट्ट्यांचे प्रस्ताव समितीकडे पाठविण्यात आले व जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता प्रदान केली. त्यामुळे ४०० अतिक्रमितांना घरकुलाचा लाभ देण्यात येत असल्याची माहिती उपअभियंता चौधरी यांनी दिली.
घरकुलासाठी २.६७ लाखविविध राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत या योजनेतील घटक क्रमांक २ मधील कार्य होत आहे. लाभार्थींना २.६७ लाखांपर्यंत व्याजदरात सवलत दिली जाते. या घटकामध्ये महापालिका क्षेत्रात साधारणपणे दोन हजार लाभार्थींना या घटकांतर्गत घरांचा लाभ दिला गेला असल्याची माहिती या विभागाने दिली.
८६० सदनिकांची कामेखासगी भागीदारीत ८६० सदनिकांची कामे प्रस्तावित आहे. केंद्र शासनाने ६१.४९ कोटींच्या प्रकल्प किमतीला मान्यता दिली. मार्च २०२२ पर्यंत निकषपात्र सदनिकांची कामे पूर्ण करण्यात येणार आहे. बडनेरा, निंभोरा, बेनोडा, नवसारी, तारखेडा, गंभीरपूर, रहाटगाव येथे सदनिकेचे बांधकाम प्रस्तावित आहे. म्हसला येथे ६० सदनिका १३ एप्रिलला लाभार्थींना हस्तांतरित झाल्या.
१० झोपडपट्टीमध्ये १६०० पट्टेवाटप प्रक्रियेतघटक-१ मध्ये हनुमाननगर, चमननगर, गंभीरपूर (लालखडी), सद्गुरूनगर बडनेरा, चपराशीपुरा, वैकंय्यापुरा, लुंबिनीनगर, बिच्छुटेकडी-१, बिच्छुटेकडी-२ व आदर्श नेहरूनगर या भागात १६०० च्या वर पट्टावाटपधारक आहे. महापालिका प्रशासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे.