मोहन राऊत/ धामणगाव रेल्वे : कोरोना चाचणी निगेटिव्ह येते की पॉझिटिव्ह, याची तपासणीला येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात भीती असते. कोरोना हा संसर्गजन्य असल्यामुळे केंद्रावर कुणाशीही संपर्क येऊ नये, याची काळजी घेतली जाते. मात्र, या कोरोना संशयितांच्या दररोज संपर्कात येणाऱ्या आरोग्यमित्राने आरटीपीआर चाचणीसाठी वर्षभरात तब्बल दोन हजार स्वॅब गोळा केले. यादरम्यान त्यालादेखील १५ वेळा स्वत:ची चाचणी करून घ्यावी लागली.
चांदूर रेल्वे तालुक्यातील जळका जगताप येथील रहिवासी असलेले आरोग्यमित्र राजेंद्र जगताप यांनी आठ वर्षांच्या सेवेत सर्वप्रथम जीवनदायी योजनेंतर्गत आरोग्यसेवेला सुरुवात केली. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी शासन व प्रशासनाने सुरू केलेल्या लढ्यात आरोग्य विभागाचे फ्रंट लाईन वर्कर म्हणून ते काम करीत आहेत. तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असून, दररोज पन्नासहून अधिक रुग्णांची आकडेवारीत भर पडत आहे. ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य मित्र राजेंद्र जगताप यांनी २२ मार्चपासून कोरोनाविरोधी लढ्यात सहभाग घेतला आहे. प्रारंभी ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर याबाबत जनजागृती केली. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच त्यांच्यावरील अधिक जबाबदारी वाढली. बाहेरून धामणगाव शहरात येणाऱ्याची नोंद घेणे, त्यांचा स्वॅब घेणे, कोरोना रुग्णांना कोविड सेंटरला रवाना करणे, अतिजोखीमग्रस्त रुग्णांचा शोध घेऊन त्यांची चाचणी करणे, कंटेनमेंट झोनमध्ये सर्वेक्षण त्यांना सोपविण्यात आली आहेत.
००००००००००००
दररोज दोनशे ते तीनशे स्वॅब घेताना सतत कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात येतो. मात्र, शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करीत असल्याने कोरोनापासून दूर आहे. गर्दी टाळली आणि मास्क, सॅनिटायझरचा वापर केला, तर कोरोनापासून राहता येते.
- राजेंद्र जगताप, आरोग्य मित्र
राजेंद्र जगतापांसारखे अनेक आरोग्यमित्र गेल्या वर्षापासून रक्ताचे पाणी करीत रात्रंदिवस अखंड सेवा देत आहेत. किमान त्यांच्या दगदगीकडे पाहून तरी कोरोनासंबंधी शासनाच्या नियमाचे सर्वांनी पालन करावे.
- डॉ. महेश साबळे, अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे