आदेशाचे उल्लंघन : वाहनचालकांकडून दंड वसुलीसह चालान देण्याचा प्रकार
अमरावती : पोलीस आयुक्त दत्तात्रेय मंडलिक यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या दोन वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना शनिवारी निलंबित करण्यात आले. गजानन तायडे व राजेश इंगोले, असे निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत. यापैकी गजानन तायडे जमादार तर राजेश इंगोले पोलीस शिपाई आहेत. पोलीस मुख्यालयालगत असलेल्या पोलीस पेट्रोलपंप पॉर्इंटवर आयुक्तांच्या आदेशाचे उल्लंघन करून हे दोघेही वाहनचालकांकडून दंड वसुली करून त्यांना चलान देत होते. नेमका हाच प्रकार त्यांच्या निलंबनासाठी कारणीभूत ठरला. शनिवारी सायंकाळी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहे. शहरातील अस्ताव्यस्त वाहतुकीला वळण लावण्याच्या उद्देशाने पोलीस आयुक्त मंडलिक यांनी विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. केवळ दंडात्मक कारवाई न करता वाहतूक सुरक्षित करण्यास त्यांनी प्राध्यान दिले आहे. त्याकरिता दंडात्मक चलान देण्याची जबाबदारी संबधीत सहायक पोलीस आयुक्त, एपीआय आणि पीएसआयकडे सोपविण्यात आली. तूर्तास प्रभारी एसीपी बळीराम डाखोरे, सहायक पोलीस निरीक्षक विकास अडागळे, पोलीस उपनिरीक्षक सुनीता काळे यांच्यासह गद्रे चौक बसस्थानक, राजकमल चौक व गांधी चौक या चार ठिकाणी तैनात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडे चलान बुक देण्यात आले आहेत. आधी ज्याच्याकडे चलान बुक देण्यात आले ते काढून घ्यावेत, असे पोलीस आयुक्तांचे निर्देश होते. मात्र, त्यानंतरही तायडे आणि इंगोले या दोंघानीही चालान बुकचा वापर केला.