अमरावती : कोरोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेक खासगी नोकऱ्यांमध्ये नोकरदारांचे पगारात कपात करण्यात आली. व्यवसाय ठप्प पडले. असे असतानाही यंदा एप्रिल ते जुलै २०२१ या चार महिन्यांत १४२० कार, तर ७,७०० दुचाकींची विक्रमी विक्री झाली आहे. त्या नवीन वाहनांची नोंदणी आरटीओ कार्यालयात झाल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी दिली.
यंदा एप्रिल ते जुलै महिन्यांत टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन करण्यात आले. मात्र, गत वर्षीच्या तुलनेत यंदा लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली. मात्र, आपली व कुटुंबाची गैरसोय होऊ नये म्हणून लोकांनी यंदाही वाहनांची खरेदी सुरूच ठेवली. सार्वजनिक प्रवासी वाहतुकीपेक्षा आपले स्वत:चे वाहनच बरे म्हणत यंदा १४२० कारची विक्री झाली. कार, दुचाकी व इतर वाहने अशा एकूण १० हजार १८ नवीन वाहनांची नोंद आरटीओकडे झाली आहे.
गतवर्षी २०२० मध्ये एप्रिल ते जुलै या चार महिन्यांत ५३१ कारची, तर ३४०५ दुचाकींची खरेदी अमरावतीकरांनी केली होती. ट्रक, ट्रक्टर, ऑटो रिक्षा, खासगी बसेस अशा एकूण ४,३९५ नवीन वाहनांची नोंद आरटीओकडे झाली होती. मात्र, यंदा नवीन वाहनांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे.
२०२० एप्रिल ते जुलै नवीन वाहने
कार - ५३२
दुचाकी - ३४०५
इतर वाहने - ४५६
एकूण वाहने - ४३९३
२०२१ एप्रिल ते जुलै नवीन वाहने
कार - १४२०
दुचाकी - ७,७००
इतर वाहने - ८९८
एकूण वाहने - १००१८
कोट
गतवर्षी कडक लॉकडाऊन होता. म्हणून नवीन वाहनांच्या खरेदीत घट झाली. लॉकडाऊन यंदाही होता; पण काही शिथिलता देण्यात आली. त्यामुळे यंदा नवीन वाहनांची खरेदी दुप्पट झाली आहे. यातून आरटीओला चांगला टॅक्स मिळाला.
रामभाऊ गिते, प्रादेशिक परिवहन अधिकारी, अमरावती