अमरावती : चांदूरबाजार तालुक्यातील ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा व चांदूरबाजार पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईत सात आरोपींकडून २९ दुचााकी जप्त केल्या होत्या. त्यानंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान, कोठडीदरम्यान आरोपींनी दिलेल्या कबुलीजबाबानुसार, आतापर्यंत चोरीच्या ५३ दुचाकी जप्त करण्यात ब्राम्हणवाडा थडी पोलिसांना यश आले आहे. तपासादरम्यान, दुचाकी चोरणाऱ्या या टोळक्याने नागरी भागाकडे न वळता शेतालगतच्या रस्त्यांवर ठेवलेल्या दुचाकींना टार्गेट केल्याचे निष्पन्न झाले आहे.
ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत नऊ आरोपींना अटक केली. त्यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना २३ जून रोजी न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यांना पुन्हा एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. जप्त केलेल्या दुचााकी, नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने त्या आरोपींची पुन्हा पोलीस कोठडी मागितली जाणार आहे. दरम्यान, आज अनेक शेतकरी दुचाकीने शेत गाठतात. मात्र, पांदण रस्त्याची दुरवस्था व पावसामुळे अनेकदा दुचाकी शेताजवळच्या रस्तावर उभी करून ठेवली जाते. ही टोळी नेमकी चांदूरबाजार तालुक्यातील खेडोपाडी शेतशिवाराच्या मार्गाने फिरायची. दुचाकींचा शोध घेऊन मालकाचा कानोसा घ्यायचा, कुणीही नसल्याची खात्री केली, ती दुचाकी लांबवायची. हा चोरांचा शिरस्ता असल्याचे समोर आले आहे. जप्त केलेल्या बहुतांश दुचाकी या चांदूरबाजार तालुक्यातील ग्रामीण भागातून चोरीला गेल्या आहेत.
कोट
जप्त ५३ दुचाकींपैकी बहुतांश दुचाकी शेतशिवारालगतच्या रस्त्यावरून लंपास करण्यात आल्या. आरोपींनी तशी कबुली दिली आहे. घरासमोरून दुचाकी चोरीला गेल्याची प्रकरणे नगण्य आहेत.
संजय शिंदे,
पोलीस उपनिरिक्षक, ब्राम्हणवाडा थडी