ब्राह्मणवाडा थडी : स्थानिक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरामध्ये दुचाकीचोरीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्राह्मणवाडा थडी व शिरजगाव कसबा पोलीस ठाण्याच्या परिसरात संत्र्याच्या मोठ्या बागा असून, शेतीकामासाठी शेतकरी दुचाकीचा वापर करतात. ते आपल्या दुचाकी शेताच्या धुऱ्यावर किंवा रस्तावर ठेवतात. पलीकडे मध्यप्रदेशची सीमा सुरू होते. नेमका त्याचा गैरफायदा चोर घेत आहेत.
आधीच सर्वसामान्य नागरिक कोरोना संसर्ग, वेळोवेळी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्यात वाहनचोरीच्या सत्राने परिसरातील नागरिकांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. अलीकडच्या कालावधीत ब्राह्मणवाडा थडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहनचोरीच्या सात गुन्ह्यांची नोंद झाली आहे. पोलीस विभागामार्फत नाकाबंदी सुरू असून, कागदपत्रे नसलेल्या वाहनांची पडताळणी सुरू केली आहे. नागरिकांनी आपले वाहन शेतात लावताना दृष्टीस पडेल अशा ठिकाणी लावावे व आजूबाजूला आपल्याला संशयित व्यक्ती आढळून आल्यास त्याची त्वरित माहिती पोलिसांना द्यावी, असे आवाहन ब्राह्मणवाडा थडीचे ठाणेदार दीपक वळवी यांनी केले आहे.
वाहने ठेवायची कुठे?
शेत घरापासून वा गावापासून दूर असल्याने शेतकरी ये-जा करण्यासाठी दुचाकीचा वापर करतात. धुऱ्याजवळ दुचाकी ठेवून आपल्या कामात गर्क होतात. नेमकी हीच संधी चोर शोधतात. दुचाकीचा हॅन्डल लॉक तोडून पोबारा करतात. त्यामुळे शेतात जाताना वाहन ठेवायचे तरी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.