तलावात बुडून मृत्यू झाला चा संशय
फोटो - पंकज लायदे २८ ओ
धारणी : धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हिराबंबई येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकाची दुचाकी, चप्पल व मोबाईल गावतलावाजवळ आढळून आले. यामुळे तलावात बुडून मृत्यू झाल्याचा संशयावरून गावातील नागरिकांनी व पोलिसांनी पाण्यात शोध घेतला. परंतु, शिक्षक सापडले नसल्याने पोलिसांनी जिल्हास्तरावरून बचाव पथक बोलावले आहे.
प्राप्त माहितीनुसार, धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या हिराबंबई जिल्हा परिषद शाळेमध्ये तळेगाव दशासर येथील रहिवासी बाळकृष्ण झिटे हे शिक्षक दोन वर्षांपासून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळची शाळा आटोपल्यानंतर झिटे हे दुचाकी (एमएच २७ सीपी १३६२) घेऊन गावालगत हिराबंबई तलावाकडे गेले. तेथे बाईक मोबाईल चप्पल ठेवून ते शिक्षक नेमके कुठे गेले, याचा याचा पत्ता लागला नाही. त्यांनतर पोलीस पाटलांना गावातील नागरिकांनी हा प्रकार सांगितल्यानंतर त्यांनी धारणी पोलिसांना माहिती दिली. पोलीस कर्मचारी प्रवीण बोनडे, बाबूलाल कासदेकर हे घटनास्थळी पोहोचले. त्यांना शिक्षकाचा तलावात बुडून मृत्यू तर नाही झाला, या संशयावरून त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने तलावात शिक्षकाचा शोध घेतला. परंतु, शिक्षक तलावात आढळून आले नाहीत. तलावाची खोली जास्त असल्याने शोध घेण्याकरिता जिल्हा स्तरावरून बचाव पथक बोलविण्यात आले आहे. रविवारी तलावात पुन्हा बचाव पथकाकडून शिक्षकाचा शोध घेण्यात येणार आहे.