धारणी (अमरावती) : शहरातील प्रभाग क्र ७ मधील दोन युवकांनी टिंगऱ्या गावाशेजारील शेतातील विहिरीत उडी मारली असता दोघांचाही विहिरीत बुडून मृत्यू झाला. गावकऱ्यांच्या मदतीने त्या दोघांचा मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आला असून पोलिसांनी सध्यातरी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
शहरातील नरेंद दीपक झारेकर (३५ वर्ष), विनोद किशोर दहिकर (३३ वर्ष) हे दोघे दिवाळीच्या दिवशी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या टिंगऱ्या गावाशेजारी असलेल्या पटेल यांच्या शेताजवळ बाईकने गेले होते. रस्त्याच्या कडेला बाईक उभी करून दोघेही शेतातील विहिरीजवळ गेले. त्यांनी तेथे मोबाईल, चप्पल व कपडे काढून दोघांनीही विहिरीत उडी मारली. काही वेळाने गावातील सुरेंद्र तांडील हे शेतात आंब्याचे झाडाचे पाने आणायला गेले असता त्यांना विहिरीच्या काठावर मोबाईल, चप्पल, कपडे आढळून आले. याची माहिती गावातील पोलीस पाटील देवीदास आरोटकर यांना दिली. त्यांनी धारणी पोलीस स्टेशनला माहिती देताच पीएसआय सुयोग महापुरे, पोलीस कर्मचारी जगत तेलगोटे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले.
टिंगऱ्या गावातील नागरिकांनी लोखंडी गळ दोरीला बांधून विहिरीत फिरविले असता त्या गळाला त्यातील एक मृतदेह लागल्याने नागरिकांनी त्याला ओढून बाहेर काढले. तसेच पुन्हा विहिरीत गळ फिरविला असता दुसराही मृतदेह गळाला लागला. दोन्ही मृतदेह बाहेर काढून त्यांची ओळख पटल्यानंतर दोघांच्याही नातेवाइकांनी घटनास्थळी आक्रोश केला. पोलिसांनी दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनाकरिता धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले असून सध्या तरी दोघांचाही मृत्यू अकस्मात झाल्याची नोंद धारणी पोलिसांनी केली आहे.
तिघे होते, एक पळून गेला. त्याची पोलीस चौकशी होणार
मृतक नरेंद्र झारेकर, विनोद दहिकर या दोघांसोबत त्यांच्या परिसरातील आणखी एक जण होता. तो दारू पिऊन होता. हे तिघेही त्या विहिरीवर अंघोळीसाठी गेले होते. दोघांनी विहिरीत उडी मारली तर एक तेथून पळून गेला असल्याची चर्चा परिसरात आहे. त्याची चौकशी धारणी पोलीस करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
नागरिकांनी दिवाळी साजरी केली नाही
दिवाळीच्या पूर्वसंध्येला प्रभाग क्र. सात मधील नागरिकांना त्यांच्या मृत्यूची माहिती मिळताच त्या परिसरातील नागरिकांनी दिवाळी साजरी केली नाही. त्या भागात एकानेही फटाकेसुद्धा फोडले नाही तर मंगळवारी शवविच्छेदन झाल्यानंतर त्यांचे मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. नंतर दोघांचेही घर शेजारी असल्याने दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. दोघांचीही अंत्ययात्रा एकाच वेळेला काढून त्यांच्यावर एकत्रित अंत्यसंकार करण्यात आले.