वेतनासह अनुदानाचा प्रश्न ऐरणीवर
अनिल कडू
परतवाडा : अचलपूर नगरपालिकेकडे थकीत साडेतीन कोटी रुपये अनुदानाच्या समस्येचे निराकरण होऊन वेतनाची समस्या निकाली काढावी, याकरिता प्राथमिक शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बुधवारी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारला आहे. दिवसभर अचलपूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर या शिक्षकांनी धरणे दिलेत. यात महिला शिक्षिकांसह सर्व शिक्षक एकजुटीने सहभागी झाले होते.
या लाक्षणिक संपापूर्वी प्राथमिक शिक्षकांनी अचलपूर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली होती. दरम्यान या एक दिवसीय लाक्षणिक संपाचा त्यांनी इशारा दिला होता. पण वेतनाच्या अनुषंगाने कुठलीही सकारात्मक कार्यवाही नगरपालिका प्रशासनाकडून केल्या गेली नाही. यावर लाक्षणिक संपात सर्व शिक्षक सहभागी झाले होते.
याअनुषंगाने अचलपूर उपविभागीय अधिकारी यांच्याकडे प्राथमिक शिक्षकांच्यावतीने निवेदन देण्यात आले. यात एप्रिल २०१८ पासून आजपर्यंत कार्यरत शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक, कर्मचारी यांच्या वेतनापोटी २० टक्के सहायक अनुदान नगर परिषद संचालनालय मुंबईकडून आरटीजीएस प्रणालीने नगरपरिषदेला प्राप्त झाले. १३ महिन्यांचे अनुदान व सेवानिवृत्त २३ शिक्षकांचे सेवा उपदानाचे २० टक्के असे एकूण साडेतीन कोटी रुपये नगरपालिकेकडे थकीत असल्याचे नमूद आहे.
नगरपालिकेचे विद्यमान लेखाधिकारी यांच्या अनियमित अनुदान वितरणामुळे वेतनाबाबत समस्या निर्माण झाल्या आहेत. नगर परिषद अचलपूर येथे माहे जून व जुलैचे शिक्षकांचे अनुदान उपलब्ध असताना शिक्षकांना २० टक्के अनुदान न देता इतरांच्या वेतनाची तयारी नगरपालिकेने सुरू केली आहे. शिक्षकांच्या नावे त्यांच्या हक्काचे पगारापोटीचे नगरपालिका संचालनालयाकडून प्राप्त २० टक्के सहायक अनुदान शिक्षकांच्या वेतनाकरिताच नगरपालिकेने खर्ची घालावे, ही प्रमुख मागणी शिक्षकांनी लावून धरली आहे.
१८/८/२१ फोटो