अनिल कडू
परतवाडा : चोराला चोर म्हटले तर हक्कभंग, मग छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलणाऱ्यांचं काय, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी शुक्रवारी अचलपूर येथील सर्किट हाऊसवर पत्रकारांशी बोलताना दिली.
जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी नवनीत राणा यांनी मेळघाटातील आदिवासींची नेमकी कुठली सेवा केली, मेळघाटच्या विकासाकरिता कुठले भरीव कार्य केले, यावर त्या बोलत का नाहीत. फिनले मिलचे काय, असा प्रतिप्रश्नही सुषमा अंधारे यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.
देवेंद्र फडणवीस यांच्या कूटनीतीला एकनाथ शिंदे बळी पडले आणि आपले परतीचे दरवाजे त्यांनी बंद केले. मोदीजी व अमितजींना राज्यस्तरावरील लहान-लहान राजकीय पक्ष नको आहेत. त्यामुळे एकेक लहान पक्ष ते मोडायला निघाले आहेत, असा आरोप त्यांनी केला.
उद्धवजींचे आजोळ
परतवाडा हे उद्धव ठाकरेंचे आजोळ; पण याठिकाणी प्रबोधनकार ठाकरे किंवा उद्धवजींचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक मागील २० वर्षांपासून दुर्लक्षित आहे. यावर शिवसेनेचे सुधीर सूर्यवंशी यांनी मध्येच हस्तक्षेप करून त्याचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. बोंडेंमुळे हे स्मारक उभे होऊ शकले नाही, असे मत सुधीर सूर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
ढोल-ताशांच्या गजरात स्वागत
शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे अचलपूर व परतवाडा शहरात ढोल-ताशांच्या गजरात शिवसैनिकांनी स्वागत केले. परतवाडा येथील शिवतीर्थावर त्यांनी शिवपूजन केले.