- गणेश वासनिक अमरावती - महाविकास आघाडीत लवकरच वंचित बहुजन आघाडी सामील होणार आहे. त्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी उद्धव ठाकरे, शरद पवार हे हाताळत असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिली.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने प्रदेश काँग्रेसच्या आढावा बैठकीसाठी ते गुरुवारी अमरावतीत आले होते. यावेळी रमेश चेन्नीथला प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी काँग्रेस पक्षाच्या लोकसभा निवडणुकीबाबतचा रोडमॅप सांगितला. राज्यात महाविकास आघाडी ही संयुक्तपणे निवडणूक लढविणार आहे. येत्या आठवड्यात लोकसभा निवडणूक जागा वाटपावरही मंथन होईल. महाविकास आघाडीत प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सहभागी करून घेण्यासाठी एकमत होईल, यात दुमत नाही; पण शिवसेनेचे उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे शरद पवार या दोन्ही नेत्यांवर प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलणी करण्याची जबाबदारी सोपविली आहे, असे रमेश चेन्नीथला यांनी सांगितले.
राहुल गांधी यांनी मणिपूर ते मुंबई भारत जोडो न्याय यात्रा सुरू केली असून, या न्याययात्रेला मोठे जनसमर्थन मिळत आहे. ही निवडणूक यात्रा नाही, तर देशातील सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी आहे. यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी भारत जोडण्याचे काम करत आहेत, ही यात्रा देशासाठी आहे, असे ते म्हणाले.
यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री यशोमती ठाकूर, अनीस अहमद, महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, सचिव आशिष दुआ, आ. वजाहत मिर्जा, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, नाना गावंडे, डॉ. सुनील देशमुख, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष बबलू शेखावत आदी उपस्थित होते.