अमरावती : काही बोगस लोक म्हणताहेत मी मतांची भीक मागायला आलोय. मी मतांची भीकच मागतो, बोगस उद्योग करत नाही असे टीकास्त्र उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोडले. ते अमरावती येथे आयोजित सभेत बोलत होते. ते म्हणतात मी घरी बसून होतो. मी घरी बसलो पण मी घरफोडी केली नाही. तुम्ही घरफोडे आहात. मी घरी बसलो होतो, तरी सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. मला कितीही काहीही म्हणा की मी घरी बसून काम केलं. मी घरी बसून जे काम केलं ते तुम्हाला घरं फोडूनही करता येत नाही.अशी सडेतोड टीका ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर असून आज ते अमरावतीत दाखल झाले. अमरावतीत आयोजित सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीका केली. मुंह में राम और बगल में छुरी असं आमचं हिंदुत्व नाहीये. आमचं हिंदुत्व म्हणजे अन्य धर्मांचा द्वेष नव्हे, तर हिंदुत्व म्हणजे मुंह में राम और हात में काम, असं आमचं हिंदुत्व आहे. माझी मानसं हेच माझे वैभव, असंही ठाकरे म्हणाले.
पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला यायचं, आता खोक्यातून येतं; उद्धव ठाकरेंची जोरदार टीका
मी रुग्णालयात असताना यांनी कारस्थान रचलं. रात्रीच्या भेटीगाठी करून माझं सरकार पाडलं. आता दिवसरात्र उद्धव ठाकरे.. उद्धव ठाकरे करता का माझ्याकडे काहीही नाही, मग मला इतकं का घाबरता? असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला. आज तुमच्याकडे खोकेच्या खोके पडले आहेत. तुम्ही आमदार विकत घेताय असं मी ऐकतोय. पण त्याच पैशातून माणसं वाचवा ना. माणसं वाचवली तर तुम्हाला कोणाला विकत घेण्याची गरजच लागणार नाही, असेही ठाकरे म्हणाले.
राजकारणात इतरांना संपवणं हेच भाजपचं हिंदुत्व
मतपेटीऐवजी हल्ली खोक्यातून सरकार जन्माला येतयं. तुम्ही कुणालाही मतदान करा, सरकार माझंच येणार असे जर बोलायला लागले आणि तसा पायंडा पडला तर दमदाट्या आणि पैशांचा खेळ करून कुणीही देशाचा पंतप्रधान, राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकतो. राजकारणात इतरांना संपवणं हेच भाजपचं हिंदुत्व, पैशांचा वापर करून विरोधकांना फोडतात. असंच सुरू राहीलं तर उद्या दाऊददेखील सत्ता बसवेल. मर्दाची अवलाद असाल तर सरकारी यंत्रणांना बाजुला ठेवा आणि मैदानात या, असे आव्हान ठाकरेंनी भाजपला दिले.