- गणेश वासनिक अमरावती - मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला; पण अजूनही काही लोकांची भाषा सुधारली नाही. एक म्हण आहे. ‘आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते कारटं’. आपल्या बाब्याने दोन-दोन आमदारांचा बळी घेतला आहे. मी जनतेतून निवडणूक आलो आहे. फाईट करून निवडणूक आलो आहे. लोकसभा निवडणुकीत कल्याण मतदारसंघातून मला चॅलेंज केले होते; पण ते पळून गेले. निवडणूक लढले नाही, अशी बोचरी टीका शिंदेसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर सोमवारी केली.
खासदार डॉ. शिंदे हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता दर्यापूर येथे आयोजित मेळाव्यापूर्वी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘लक्ष्य’ केले. कल्याण लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांना जनतेने जागा दाखवून दिली. काँग्रेसच्या मतांवर यांच्या जागा या निवडून आल्या. येणाऱ्या काळात उद्धवसेनेची परिस्थिती ना काँग्रेस, ना घर का ना घाट का, अशी करून ठेवेल, अशी टीका खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. खरी शिवसेना ही बाळासाहेबांची आहे, निवडणुकीत विजयाचा स्ट्राईक रेट हा शिंदेसेनेकडे आहे.
बाळासाहेब ठाकरे यांनी सतत काँग्रेसला विरोध केला आहे. आता उद्धवसेना हा काँग्रेसच्या दावणीला बांधला गेला आहे. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत उद्धवसेना कुठेच दिसणार नाही, असा दावा त्यांनी केला. महायुती सरकारने अडीच वर्षांत घेतलेले लोककल्याणकारी निर्णय हेच विधानसभा निवडणुकीत यशाचे गमक ठरेल, असा विश्वास डॉ. श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला.यावेळी माजी आमदार अभिजित अडसूळ, गजू वाकोडे, गोपाल अरबट आदी उपस्थित होते.