अनिल कडू
परतवाडा (अमरावती) : उमरखेड येथील प्राध्यापक मृत्यूप्रकरणात पोलीस कस्टडीत असलेली वनरक्षक पत्नी धनश्री देशमुख व वनरक्षक शिवम बछले या दोघांची ओळख चार वर्षांपूर्वी २०१९ मध्ये झाली. दरम्यान, या ओळखीचे रुपांतर मैत्रीत झाले.
प्रशिक्षणादरम्यान परीविक्षाधीन कालावधी पूर्ण करण्याकरिता वनरक्षक धनश्री देशमुख ही अन्य तीन महिला वनरक्षकांसह चार वर्षांपूर्वी परतवाडा वनपरिक्षेत्र कार्यालयाकडे रुजू झाली होती. त्यादरम्यान अचलपूर तालुक्यातील पथ्रोट-शिंदी शिवारात बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. या बिबट्याचा मागोवा घेत त्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेवर वनरक्षक धनश्रीसह त्या अन्य तीन महिला वनरक्षकांना तैनात करण्यात आले होते. याच सुमारास वनरक्षक शिवम बछलेसोबत धनश्रीची ओळख झाली. या ओळखीचे पुढे मैत्रीत रूपांतर झाले. पुढे ही मैत्री एकमेकांच्या सुखदुःखात मदत करण्यापुढे गेली अन् पोलीस कस्टडीपर्यंत जाऊन पोहोचली.
उमरखेड येथील प्राध्यापकाच्या मृत्यूप्रकरणी परतवाड्याच्या दोन वनरक्षकांना अटक
तिरंगा रॅलीला छुट्टी
हर घर तिरंगा अंतर्गत जनजागृतीच्या अनुषंगाने दहिगाव-अंजनगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत १ ऑगस्टला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीदरम्यान वनरक्षक धनश्री देशमुख सुटीवर होत्या. त्यांनी आपला सुटीचा अर्ज अकोटवरून अन्य वनरक्षकांमार्फत वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांकडे पाठविला.
वाहनाचा तपास
प्राध्यापकाच्या मृतदेहाची विल्हेवाट लावताना वापरल्या गेलेल्या वाहनाचा तपास पोलीस करीत आहेत. ते वाहन परतवाड्यातील असण्याचा संशय पोलिसांना आहे.
घटनेच्या अनुषंगाने पोलीस कस्टडीत असलेल्या वनरक्षकाविरुद्ध दाखल गुन्ह्यांची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. एफआयआरची प्रतीक्षा आहे. पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. चौकशीच्या अनुषंगाने त्यांना आवश्यक माहिती दिली जात आहे.
- प्रदीप भड, वनपरिक्षेत्र अधिकारी, परतवाडा
दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने एफआयआरची मागणी करण्यात आली आहे. पोपटखेडा वर्तुळाचे वनपालांकडून पोलीस विभागाच्या चौकशी अधिकाऱ्यांनी माहिती घेतली आहे.
- सुनील राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी, अंजनगाव.