अमरावती : उमेद अभियानांतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाºयांनी सोमवारी सकाळी ११ वाजता विविध मागण्यांसाठी इर्विन चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत धडक मोर्चा काढला. यावेळी उमेद कंत्राटी कृती समितीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यात २०११ पासून सुरू आहे. या अभियानांतर्गत महिलांच्या संस्था उभ्या करणे (बचतगट, ग्रामसंघ, प्रभागसंघ) महिलांची क्षमता बांधणी करणे त्यांना आर्थिकदृष्ट्या साक्षर करून आर्थिक समावेशन करणे व शाश्र्वत उपजीविका निर्माण करणे हे प्रमुख कार्य पार पाडले जाते. या कामांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी अभियानाने मनुष्यबळ संसाधन मार्गदर्शिकेनुसार राज्य, जिल्हा, तालुका, प्रभाग व ग्रामस्तरावर अभियान कक्षाची स्थापना व संरचना केली आहे. त्यात विविध विषयांच्या तज्ज्ञांची नियुक्ती सरळ सेवा भरती व शासनाने नेमलेल्या बिंदूनामावलीप्रमाणे व सामाजिक आरक्षणानुसार करण्यात आली. त्यांना सात वर्षे प्रशिक्षित करून पारंगत करण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यात ४ लाख ७८ हजार बचतगट तयार झाले असून, यामध्ये ४९ लाख ३४ हजार ६०१ कुटुंबांतील महिला सहभागी आहेत.
वरील सर्व कामे काही वर्षांपासून उमेदमधील कंत्राटी कर्मचारी करीत होते. मात्र, १० सप्टेंबर रोजी ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी आदेश काढून कार्यरत कर्मचाºयांना पुनर्नियुक्ती प्रक्रिया थांबविल्यामुळे यातील कार्यरत कर्मचाऱ्यांनी संबंधितांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी. कोणत्याही बाह्यसंख्येला कर्मचारी नियुक्तीचे अधिकार देऊ नये, उमेद अभियानाच्या मूळ मनुष्यबळ संसाधन धोरणानुसारच सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदे कायम ठेवावी, ग्रामविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पदावरून हटवावे.
उमेद अभियानांतर्गत महिला स्वयंसहाय्यता समूह, ग्रामसंघ, प्रभागसंघांना दिला जाणारा खेळता भांडवल निधी समुदाय गुंतवणूक निधी जोखीम प्रवणता निधी यात दुप्पट वाढ करावी व निधी वेळेत द्यावा आदी मागण्यांसाठी विशाल मोर्चा काढला. यावेळी कृती समितीचे किरण पातुरकर, विजय पाटील, अजय कुलथे, शीतल गर्जेवार, कृष्णा ठाकरे, अमोल देवलशी, गजानन देशमुख, मंगेश खोंडे, दीपक खताडे, सुरेखा लुंगारे, राधा कुरील, कुसूम शाहू, संध्या टिकले आदी उमेद कर्मचारी, बचत गटातील महिला सहभागी झाल्या होत्या.