अमरावती : बहुचर्चित उमेश कोल्हे हत्येचा तपास हाती घेतल्यानंतर एनआयएने सातही आरोपींचा ताबा घेतला. त्या सातही आरोपींना ६ जुलैरोजी प्रचंड पोलीस बंदोबस्तात मुंबईला हलविण्यात आले. इकडे एनआयएच्या दुसऱ्या चमूने संशयितांची धरपकड व चाैकशीचे सत्र सुरूच ठेवले आहे. हत्येचा मास्टरमाईंड असलेल्या शेख इरफानच्या ‘रहबर’ या स्वयंसेवी संस्थेशी संबंधित नऊ संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. नागपुरी गेट ठाण्याच्या हद्दीतील त्या संशयितांना गुरुवारी दुपारी शहर कोतवालीत आणण्यात आले. तेथे त्यांची उलट तपासणी करण्यात आली.
५ जुलै रोजी एनआयएने शहर कोतवाली पोलिसांकडून या प्रकरणाची संपूर्ण केस डायरी, पोलिसांनी जप्त केलेले चाकू, सीसीटीव्ही फुटेज, आरोपींच्या सीडीआरचा डेटा, असा इत्यंभूत दस्तावेज ताब्यात घेतला. सहा आरोपींच्या कबुली जबाबानंतर, कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा हिच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने करण्यात आल्याने झाल्याच्या निष्कर्षाप्रत आल्यानंतर मास्टरमाईंड शेख इरफानला अटक करण्यात आली. त्यानंतर शेख इरफान हा मास्टरमाईंडच्या ‘रहबर’ या एनजीओवर ‘फोकस’ करण्यात आला.
कोरोना काळात शेख इरफानने नागरिकांनी केलेली मदत समोर आली. ती मदत नेमक्या कुणाच्या पैशातून करण्यात आली, त्याचा शोध एनआयएने चालविला आहे. त्या शोधमालिकेत एका प्रतिबंधित कट्टरतावादी संघटनेचे नावदेखील समोर आले. तो धागा पकडत ‘रहबर’शी संबंधित सदस्यांची झाडाझडती घेतली जात आहे.
गुरुवारी दुपारीदेखील नऊ संशयितांची चौकशी करण्यात आली. शेख इरफानच्या एनजीओला फंडिंग कुणी केली, ती संघटना कोण, व्यक्ती कोण, त्या संघटनेची भूमिका काय, यापूर्वी त्या संघटनेचा देशविघातक कृत्यात सहभाग राहिला की काय, अशा सर्व दिशेने एनआयए तपास करीत आहे. सातही आरोपी एनआयएने मुंबईला हलविले असले, तरी एनआयएचे अधिकारी अद्यापही शहरात तळ ठोकून आहेत.
आक्षेपार्ह लेखनसाहित्य जप्त
एनआयएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुरुवारी शहर कोतवालीच्या ठाणेदारांच्या कक्षात बसून प्रकरणाशी संबंधित डाॅक्युमेंटेशनवर भर दिला. तर, पथकातील अन्य पोलीस अधिकाऱ्यांनी शहर कोतवाली व नागपुरी गेट पोलिसांच्या सहकार्याने सर्चिंग मोहीम सुरूच ठेवली. दरम्यान, ६ जुलैरोजी आपण शहरातील १३ ठिकाणी धाडसत्र राबविले. आरोपी व संशयितांकडून मोबाईल, सीमकार्ड, मेमरी कार्ड, डीव्हीआर, द्वेष पसरविणारे पॉम्प्लेट व कागदपत्रे आणि साहित्य (लिटरेचर) चाकू जप्त करण्यात आल्याची माहिती एनआयएने प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.