अमरावती : येथील मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात मंगळवारी रात्री अटक करण्यात आलेले दोन आरोपी हे आधी अटक केलेल्या सातही आरोपींचे ‘क्रिमिनल असोसिएट्स’ (गुन्ह्यातील भागीदार) असल्याचे एनआयएने म्हटले आहे. माैलाना मुशफिक अहमद अ. रशीद (४१, रा. बिलाल कॉलनी, अमरावती) आणि अब्दुल अरबाज अ. सलीम (२३, रा. इमामनगर, लालखडी, अमरावती) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोन्ही आरोपींना त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. त्यांना ७ ऑगस्टपर्यंत ‘ट्रान्झिट रिमांड’ देण्यात आला असून, त्यांना त्यापूर्वी एनआयएच्या मुंबईस्थित न्यायालयात उपस्थित करण्यात येणार आहे.
दरम्यान, बुधवार सकाळपासून गुरुवारी दुपारपर्यंत एनआयएच्या तीन अधिकाऱ्यांच्या चमूने मौलाना मुशफिक व अरबाजची कसून चौकशी केली. कोल्हेंची हत्या करून पळालेल्या आरोपींसह डॉ. युसुफ व शेख इरफान यांच्या फरार कालावधीचा खर्च उचलण्यासाठी काहींकडून रक्कम गोळा करण्यात आली व ती मुशफिकने गोळा केली, असा आरोप आहे. याआधी अटक करण्यात आलेल्या सातही आरोपींना या दोन्ही आरोपींनी प्रत्यक्षात मदत केल्याचे एनआयएच्या तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी एनआयएचे पथक अमरावतीत ठाण मांडून आहे. दरम्यान, गुरुवारी स्थानिक पोलिसांच्या मदतीने दोन्ही आरोपींच्या घरांची झाडाझडती घेतली. शहर कोतवाली, नागपुरी गेट व गुन्हे शाखेची टीम देखील एनआयएसोबत होती.
२१ जूनला खून, २ जुलैला उलगडा
२१ जून रोजी रात्री १०.३०च्या सुमारास प्रभात चौकाकडून श्याम चौकाकडे जाणाऱ्या नूतन कन्याशाळेजवळ मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. चाकूने हत्या करणाऱ्या पाच आरोपींसह पशुचिकित्सक युसूफ खान व मास्टरमाईंड इरफान खान याला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा धक्कादायक उलगडा करण्यात आला. २ जुलै रोजी पोलिसांनी पत्रकार परिषद घेत उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्याने झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्याचदिवशी या प्रकरणाचा तपास अधिकृतपणे एनआयएकडे गेला. एनआयएने याप्रकरणी मुंबई येथे सातही आरोपींविरूद्ध युएपीए अन्वये स्वतंत्र एफआयआर नोंदविला होता.